Newasa: जिल्हा पुरवठा विभागातील अर्थपूर्ण लागेबांधे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सरकारी मोफत धान्य योजनेला भ्रष्टाचाराची मोठी कीड लागली आहे. नेवासा तालुक्यात रेशनच्या गव्हाला पाणी मारून तो गोदामात आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केंद्र सरकार गोरगरिबांना दोन वेळचे अन्न मिळावे म्हणून मोफत धान्य पुरवत असताना, दुसरीकडे वाहतूक कंत्राटदार आणि विभागातील काही भ्रष्ट अधिकारी या योजनेचा बळी घेत असल्याचे चित्र समोर आले आहे. नेवासा येथील सरकारी गोदामात चार दिवसांपूर्वी गव्हाचे दोन ट्रक दाखल झाले होते. या ट्रकमधील गव्हावर चक्क पाणी मारलेले असल्याने धान्याचा उबट वास सुटला होता. येथील कर्तव्यदक्ष गोदामपालाने हा ओला माल उतरवून घेण्यास नकार दिल्याने या काळ्या कृत्याचा भंडाफोड झाला. नगर येथील मुख्य गोदामातून तालुक्यांना धान्य वितरित करणाऱ्या वाहतूक कंत्राटदारांचे धाडस इतके वाढले आहे की, ते थेट धान्याच्या वजनात वाढ करण्यासाठी पाणी मारण्याचा प्रकार करत आहेत. या प्रकारामुळे गव्हाची प्रत खराब होऊन तो खाण्यायोग्य राहत नाही, परिणामी गोरगरीब रेशनकार्डधारकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. केवळ पाणी मारून वजन वाढवणे एवढ्यावरच हा भ्रष्टाचार थांबत नाही, तर रेशनच्या पोत्यांमधील धान्याची चोरी ही दुसरी मोठी समस्या आहे. कागदोपत्री ५० किलोचा असलेला गव्हाचा कट्टा प्रत्यक्षात ४८ ते ४९ किलोच भरत असल्याचे वास्तव समोर आले आहे. प्रत्येक कट्ट्यामागे एक ते दीड किलो धान्य कमी देऊन दरमहा लाखो रुपयांचा गफला केला जात आहे. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशा भूमिकेत असलेले अधिकारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने हा साखळी भ्रष्टाचार फोफावला आहे. आता या गंभीर प्रकरणाची दखल जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेऊन या विभागाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करावी आणि गोरगरिबांना दर्जेदार धान्य मिळवून द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.