पुणे जिल्हा | भारत फोर्जचा पुढाकार कौतुकास्पद

माळेगाव, (वार्ताहर) – जगात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असून, विद्यार्थ्यांना असे शिक्षण देण्यासाठी भारत फोर्ज कंपनीने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
माळेगाव (ता. बारामती) येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भारत फोर्ज कंपनीच्या वतीने सीएसआर फंडातून उभारलेल्या डिजिटल सीएनसी. सिम्युलेशन लॅबचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भारत फोर्ज कंपनीच्या डॉ. लीना देशपांडे, रमाकांत भावसार, प्राचार्य अवधूत जाधवर, जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय येळे, रणजित तावरे, दीपक तावरे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
पवार म्हणाले की, दावोस येथे झालेल्या जागतिक उद्योग समूहाच्या बैठकीत एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले प्रकल्प महाराष्ट्रात येत आहेत. युरोपियन देशांबरोबर इतर देशांत युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी जर्मनसारख्या प्रगत देशासोबत सामंजस्य करार केला आहे.
भविष्यात चार लाख नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. देशात दोन लाख रुपये प्रति महिना पगार मिळणार आहे. जर्मन भाषा शिकवण्यासाठी शासन मदत करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, डॉ. लीना देशपांडे म्हणाल्या की, भारत फोर्ज कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील अनेक आयटीआयला मदत केली जाणार आहे. जागतिक पातळीवर कुशल ज्ञान आवश्यक असलेले विद्यार्थी घडविण्याचे काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रा. अनिल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. गटनिदेशक संतोष सपकळ यांनी आभार मानले.





