पुणे जिल्हा | पुरंदरच्या कृषीविश्वात टोमॅटोवर जोर

बेलसर, {निखील जगताप} – पुरंदर तालुक्यामध्ये बेलसर, वीर, धालेवाडी, कोथळे, भोसलेवाडी, पारगाव, परिंचे, नीरा, दिवे या भागात टोमॅटो पिकाचे विक्रमी उत्पन्न घेतले जाते. वीर आणि बेलसर हे टोमॅटो पिकाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मागील वर्षी शेतकर्यांना चांगला बाजारभाव मिळाल्याने बहुतांश शेतकरी टोमॅटो पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत.
पुरंदर तालुक्यात मागील वर्षी सुरुवातीच्या काळात अत्यंत कमी क्षेत्रावर लागवड झाली होती; परंतु बाजारभाव वाढल्याने अनेक शेतकर्यांनी टोमॅटो लागवडीला पसंती दिली होती.तर यावर्षी तालुक्यात अत्यंत बिकट दुष्काळ असला तरीही शेतकरी टोमॅटो पीक लागवडीस प्राधान्य देत आहेत.
अत्यंत कमी पाण्यावर पिकाचे नियोजन शेतकर्यांनी केलेले पाहायला मिळत आहे. बेलसर, वीर व दिवे परिसरात टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. वीर धरण व पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाण्यावर शेतक-यांनी लागवड केल्याचे शेतकरी सांगतात. पावसाचे वातावरण पाहून व पाण्याची उपलब्धता यावर शेतकर्यांनी लागवडीचे नियोजन केले आहे.
मागील हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर शेतकर्यांनी शेताची मशागत पूर्ण केली आहे. त्यामध्ये नांगरट, काकर-पाळी, बेड तयार करणे, ड्रिप बसविने त्यासोबतच इतर टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी लागणार्या गोष्टींची तयारी शेतकर्यांनी सुरू केली आहे. तर काही प्रमाणात लागवडी सुरू झाल्या आहेत.
तालुक्यामध्ये सध्या आर्यमान वाणाच्या रोपांची लागवड सुरू आहे. शेतकर्याने टोमॅटो लागवडीसाठी जमीन तयार करून ठेवली आहे. बहुसंख्य शेतकर्यांनी बेड तयार करून त्यावर ड्रीप जोडून जमीन लागवडी योग्य केली आहे; परंतु अद्याप पाऊस पडत नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
यंदाही मैलाचा दगड ठरणार?
मागील वर्षी राज्यभरात जुलै महिन्यात टोमॅटोच्या बाजार भावाने उच्चांक गाठला होता. कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथे टोमॅटो पिकाचे बाजारभाव 2000 ते 5000 रुपये प्रति क्रेट असे होते. त्यामुळे हे यंदाही बाजार भाव असेच राहतील आणि शेतकर्यांना अधिकचे पैसे मिळवून देण्यासाठी टोमॅटो मैलाचा दगड ठरेल अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
मल्चींग पेपरचा वापर
पारंपरिक शेती सोबत आधुनिकतेकडे तालुक्यातील शेतकर्यांनी पाऊल टाकले आहे. टोमॅटो लागवडीसाठी बेलसर व परिसरातील शेतकर्यांनी मल्चिंग पेपरचा वापर केला आहे. मल्चिंग पेपरचे अधिक फायदे असल्याने तो अत्यंत उपयुक्त ठरतो. पाण्याची बचत, खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन त्यासोबतच पिकांच्या वाढीसाठी व सर्वांगीण विकासासाठी मल्चिंग पेपर फायदेशीर ठरतो.
रोग व किड नियोजनावर अधिक भर
मागील वर्षीच्या हंगामामध्ये प्लास्टिक रोग व टुटाआळी, तिरंगा, फळ पोखरणारी आळी, नाग आळी त्यासोबतच इतर करपा, विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव टोमॅटोवर दिसून आला होता. त्यामुळे चालू वर्षी शेतकरी कीटकनाशक, बुरशीनाशक आणि बॅक्टेरिया नाशकाचा अधिकच्या फवारणीसाठी सज्ज आहेत व पिकाचे गुणवत्तापूर्वक उत्पादन काढण्यास शेतकरी सकारात्मक आहेत.
उष्णतेचा टोमॅटो पिकावर परिणाम
तालुक्यामध्ये मे महिन्यामध्ये ज्या टोमॅटो पिकाच्या लागवडी झाल्या आहेत. त्यांना उष्णतेचा परिणाम सोसावा लागत आहे. वरच्या उष्णतेमुळे पानांच्या कडा करपून रोपांना इजा होत आहे. त्यामुळे शेतकर्यांना अधिकची काळजी घ्यावी लागत आहे.





