पुणे – बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून युवा पिढीला सकारात्मक जीवनमूल्यनकडे वळविण्यासाठी सरहद पुणे, आर्हम फाउंडेशन व समिधा इंडिया फाउंडेशन या संस्थांकडून एक अभियान सुरू करण्यात आले आहे. ‘बीड वाचतंय’ या अभियानाअंतर्गत पुण्यामधील नागरिकांना पुस्तके देण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रस्ता येथे पुस्तक संकलनासाठी रविवार हा सुट्टीचा दिवस निवडण्यात आला होता. या उपक्रमाला पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ऐतिहासिक कादंबऱ्या, आत्मचरित्रे, स्पर्धा परीक्षांसाठीची पुस्तके अशी विविध विषयांची २००० पेक्षा जास्त वाचनीय पुस्तके लोकांकडून जमा करण्यात आली. नागरिकांकडून ‘बीड वाचतंय’ साठी शुभेच्छा देऊन असे पुस्तक संकलन उपक्रम पुण्यातील विविध भागात घेण्यासाठी सूचनाही मिळाल्या. पुस्तके देणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचे आर्हमचे संस्थापक डॉ. शैलेश पगारिया, युवा उद्योजक व लेखक शरद तांदळे सर व समिधाच्या संपूर्ण टीमकडून आभार मानण्यात आले. यापुढे प्रत्येक रविवारी पुण्यातील विविध भागांमध्ये हे पुस्तक संकलन सुरू ठेवण्यात येणार आहे. याकरिता आपल्याकडील नवीन/जुनी वाचनीय पुस्तके ‘बीड वाचतंय’ या अभिनयानासाठी द्यायची असल्यास ८६६८६०७३०० या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन संयोजन समितीकडून करण्यात आले आहे.