राज्यात खळबळ..! नटून थटून आलेला नवरदेव भर मंडपातून पळाला; नेमकं काय घडलं?
Beed Crime News : बीड जिल्ह्यातील कपिलधार येथे अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.

Beed Crime News : बीड जिल्ह्यात बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बीडजवळील कपिलधार परिसरातील एका मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सापळा रचला.
लग्न सुरू असतानाच पोलिसांचा छापा
पोलिस पथक मंगल कार्यालयात दाखल झाले असता, लग्नसोहळा सुरू असल्याचे आढळून आले. नातेवाईक उपस्थित होते आणि विधी सुरू होते. मात्र पोलिसांची चाहूल लागताच नवरदेवाने भर मंडपातूनच पळ काढत लग्न अर्धवट सोडले, अशी धक्कादायक घटना घडली.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, बालविवाह अजूनही छुप्या पद्धतीने कसे घडत आहेत, याचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. महाराष्ट्रात बालविवाहाला कायद्याने बंदी असतानाही ग्रामीण भागात असे प्रकार घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
१०० जणांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात वधू-वराचे आई-वडील, जवळचे नातेवाईक, वऱ्हाडी मंडळी तसेच कपिलधार देवस्थानच्या विश्वस्तांसह सुमारे १०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, पलायन केलेल्या नवरदेवाचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक असल्याचे याआधीही समोर आले आहे. पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करत असतानाही असे प्रकार कसे घडतात, यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.






