Mutha Canal : मुठा कालव्याचे कुलूप तोडून पाण्याची ‘चोरी’; उरुळी कांचनमध्ये अज्ञात इसमाचा धाडसी प्रताप
Mutha Canal : उरुळी कांचन येथील खेडेकर मळा परिसरात मुठा कालव्याच्या वितरिका क्र. ५० चे कुलूप तोडून बेकायदेशीरपणे पाणी सोडले.

Mutha Canal – मुठा कालव्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून बेकायदेशीरपणे पाणी सोडल्याची घटना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील खेडेकर मळा परिसरात घडली आहे. या प्रकारामुळे सिंचन विभागाच्या पाणी वितरण व्यवस्थेत मोठी अनियमितता निर्माण झाली असून, शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी (दि. 14) दुपारी दोन ते बुधवारी (दि. 15) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अजिंठा लाँड्री शेजारी असलेल्या जुना मुठा कालवा वितरिका क्र. 50 (किमी 60/200) येथे हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गिरीषकुमार महादेव जाधव (वय 39, व्यवसाय-नोकरी रा. हडपसर इस्टन एलिगन्स सोसायटी फ्लॅट नं 409, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन हद्दीतील खेडेकर मळा आणि अजिंठा लाँड्री शेजारी असलेल्या जुना मुठा कालवा वितरिका क्र. 50 (किमी 60 /200) येथील दरवाजाला प्रशासनाने कुलूप लावले होते.
मात्र, 14 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपासून ते 15 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान, कोणा अज्ञात इसमाने या दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर दरवाजा वर उचलून बेकायदेशीरपणे पाणी सोडल्याने पाणी वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाला.
याप्रकरणी पाटबंधारे विभागाचे अधिकारी गिरीषकुमार जाधव यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.





