स्थानिक यंत्रणा सक्षम झाल्याशिवाय बालविवाह रोखणे कठीण आहे: पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे

नेवासा : नेवासा पंचायत समिती व स्नेहालय उडान प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील ग्रामसेवकांसाठी विशेष बालविवाह प्रतिबंधक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत नेवासा पोलिस ठाण्याचे परिविक्षाधिन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे, गटविकास अधिकारी संजय लखवाल आणि स्नेहालय उडान प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना संतोष खाडे म्हणाले की, स्थानिक यंत्रणा सक्षम झाल्याशिवाय बालविवाह रोखणे कठीण आहे असे स्पष्ट मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. बालविवाह हे केवळ कायदेशीर गुन्हा नसून सामाजिक विषमतेचे मूळ आहे बालविवाहास कारणीभूत असलेल्या प्रथांवर आणि व्यावसायिक घटकांवर लक्ष केंद्रित करत पोलिस प्रशासन आणि पंचायत समितीच्या माध्यमातून स्पष्ट सूचना आणि कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
“मी स्वतः बीड जिल्ह्यातील असून बालविवाहाचे परिणाम अनुभवले आहेत ऊसतोड मजुराच्या कुटुंबातील असल्याने या समस्येचे मूळ माहीत आहे,” असे सांगत त्यांनी बालविवाहामुळे उध्वस्त होणाऱ्या मुलींच्या आयुष्याची व्यथा त्यांनी यावेळी मांडली. ते पुढे म्हणाले की, विवाहात मदत करणारा, आयोजन करणारा, तसेच जेवण करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई होते.
या कार्यशाळेत स्नेहालय उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी कार्यक्रमात बोलताना दिली. त्यांनी ‘उडान’ व ‘मुक्ती वाहिनी’ या प्रकल्पांची सविस्तर माहिती देत बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालविवाह रोखण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आणि पुनर्वसनासाठी आवश्यक असलेली बालकल्याण समितीची भूमिका समजावून सांगितली.
तसेच ग्राम बाल संरक्षण समित्या, स्थानिक यंत्रणांशी समन्वय आणि कायद्यानुसार पोलिस आणि पंचायत यांच्यातील भूमिका कशा असाव्यात यावरही सखोल माहिती देण्यात आली ‘माझं गांव बालविवाहमुक्त गांव’ आणि ‘माझी शाळा बालविवाहमुक्त शाळा’ या दोन मोहिमांची संकल्पना मांडत या उपक्रमांना ग्रामपंचायतस्तरावर राबवण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी संपूर्ण प्रशिक्षणाचा सारांश सादर करत स्नेहालय व पोलिस प्रशासनाचे आभार मानले. “2027 पर्यंत नेवासा तालुका बालविवाहमुक्त करण्यासाठी पंचायत समिती स्नेहालयसोबत पूर्ण सहकार्य करेल,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या यशस्वी कार्यशाळेसाठी स्नेहालय उडान प्रकल्पाचे सोशल वर्कर पूजा दहातोंडे,शाहिद शेख,सीमा जुनी, हॉस्पिटलचे प्रमुख मनोज देशपांडे,साजन शेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक प्रवीण कदम यांनी केले, तर आयोजनाची संपूर्ण जबाबदारी पंचायत समितीच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी पार पाडली.





