IPL Impact Player : IPL मधील ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम रद्द होणार? बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना पाठवले महत्त्वाचे पत्र
IPL Impact Player : बीसीसीआयने आयपीएलच्या सर्व १० फ्रँचायझींना अधिकृत पत्र लिहून या नियमावर त्यांचे अंतिम मत मागवले आहे.

BCCI Seeks Franchise Feedback On IPL Impact Player Rule Rohit Gill Objections : आयपीएलमध्ये फलंदाजांची वाढती धावसंख्या आणि गोलंदाजांवर येणारा अतिरिक्त ताण या पार्श्वभूमीवर वादग्रस्त ठरलेला ‘इम्पॅक्ट प्लेयर’ (Impact Player Rule) नियम पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या सर्व १० फ्रँचायझींना अधिकृत पत्र लिहून या नियमावर त्यांचे अंतिम मत (Feedback) मागवले आहे. सर्व संघांना आपली सविस्तर भूमिका मांडण्यासाठी सोमवार, ३१ ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली असून, यानंतर या नियमाच्या भवितव्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
फलंदाजांची चांदी अन् गोलंदाजांची दाणादाण; क्रिकेट जगतात दोन गट –
आयपीएलमध्ये १२ वा खेळाडू म्हणून वापरल्या जाणाऱ्या ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमामुळे स्पर्धा दोन गटांत विभागली गेली आहे. मागील मोसमात अतिरिक्त फलंदाजाच्या सुरक्षिततेमुळे संघांनी २५० हून अधिक धावांचा डोंगर सहज उभारला. यामुळे सामन्यांमधील संतुलन बिघडल्याचा आरोप गोलंदाजांकडून केला जात आहे. रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि शुबमन गिल यांसारख्या भारताच्या आघाडीच्या खेळाडूंनी या नियमामुळे ऑलराउंडर्सचे महत्त्व कमी होत असल्याचा थेट आरोप करत या नियमाला उघड विरोध दर्शवला आहे.
अंपायरिंग, सराव सत्रे आणि सुरक्षेवरही बीसीसीआयचे मंथन –
BREAKING 🚨
The Board of Control for Cricket in India has sought feedback from IPL franchises on the much-debated Impact Player rule.
The board has sought the franchises’ views on several other issues as well, including PMOA matters, umpiring, practice sessions and playing… pic.twitter.com/K7S2BpgdSA
— Cricbuzz (@cricbuzz) August 30, 2026
‘क्रिकबझ’च्या वृत्तानुसार, बीसीसीआयने केवळ इम्पॅक्ट प्लेयरच नव्हे, तर क्रिकेट ऑपरेशन्सशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर फ्रँचायझींचे मत मागवले आहे. यामध्ये सामना अधिकाऱ्यांचे निर्णय, अंपायरिंगचा दर्जा, सराव सत्रे, सामन्यांच्या अटी आणि पीएमओए (PMOA) परिसरातील खेळाडूंची सुरक्षा या मुद्द्यांचा समावेश आहे. गेल्या मोसमात अनधिकृत व्यक्ती खेळाडूंच्या जवळ पोहोचल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यावरही नवीन उपाययोजना आखल्या जाणार आहेत.
कप्तानांच्या बैठकीनंतर बीसीसीआय सतर्क; नियमात होणार मोठा बदल?
गेल्या मोसमातील कप्तानांच्या बैठकीत हा नियम आणखी एका वर्षासाठी कायम ठेवण्याचे संकेत देण्यात आले होते; मात्र दिग्गज खेळाडूंचा वाढता विरोध पाहता बीसीसीआयने सर्वसमावेशक आढावा घेण्याचे ठरवले आहे. फ्रँचायझींच्या क्रिकेट ऑपरेशन्स टीमशी चर्चा करून पाठवल्या जाणाऱ्या फीडबॅकच्या आधारे आगामी हंगामापूर्वी अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यामुळे पुढील आयपीएलमध्ये हा नियम पूर्णपणे रद्द केला जाणार की त्यात काही सुधारणा होणार, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.





