IND W vs THA W : शफालीची वादळी खेळी, पण मधल्या फळीने केला घात! थायलंडच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांनी टाकल्या नांग्या
IND W vs THA W : भारतीय महिला क्रिकेट संघाला थायलंडच्या अचूक फिरकी माऱ्यापुढे आणि चपळ क्षेत्ररक्षणापुढे प्रचंड संघर्ष करावा लागला.

IND W vs THA W Shafali Verma Fifty Middle Order Collapse Suleeporn Laomi Bowling : एसीसी महिला आशिया कप २०२६ (ACC Women’s Asia Cup 2026) स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत भारतीय महिला क्रिकेट संघाला थायलंडच्या अचूक फिरकी माऱ्यापुढे आणि चपळ क्षेत्ररक्षणापुढे प्रचंड संघर्ष करावा लागला. नाणेफेक जिंकून थायलंडने भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. सलामीवीर शफाली वर्माच्या (Shafali Verma) स्फोटक अर्धशतकानंतरही भारतीय संघाची मधली फळी अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. भारताला निर्धारित २० षटकांत ९ बाद अवघ्या १५९ धावांपर्यंतच मजल मारता आली.
शफाली वर्माची ३६ चेंडूंत ६४ धावांची आतषबाजी; एकाकी झुंज!
स्मृती मानधना स्वस्तात धावचीत झाल्यानंतर शफाली वर्माने एका टोकाकडून चौफेर फटकेबाजी करत थाई गोलंदाजांवर हल्ला चढवला. तिने अवघ्या ३६ चेंडूंत ८ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकारांच्या जोरावर ६४ धावांची धमाकेदार खेळी साकारली. तिला प्रतिका रावलने १८ चेंडूंत २२ धावा करून चांगली साथ दिली. अखेरच्या टप्प्यात क्रांती गौडने ८ चेंडूंत नाबाद १५ धावांचे योगदान दिल्याने भारताचा धावफलक १५९ पर्यंत पोहोचू शकला.
भारताच्या ६ फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही –
Team India will be disappointed to finish on 159 after being well over 100 at the halfway stage. Credit to Thailand’s spinners for sticking to their plans and pulling things back brilliantly. A spicy second half awaits ~ can Thailand chase this down and make history? 🤔 pic.twitter.com/qXMdWRqOV8
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) August 30, 2026
शफाली बाद होताच भारताची फलंदाजी गडगडली. कर्णधार हरमनप्रीत कौर अवघ्या ५ धावांवर तंबूत परतली, तर आक्रमक फलंदाज रिचा घोष पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाली. भारती फुलमाली (१३ धावा), दीप्ती शर्मा (५ धावा – रनआऊट), प्रेमा रावत (६) आणि नंदनी शर्मा (१) एकापाठोपाठ एक बाद झाल्या. भारताच्या तब्बल ६ फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकल्या नाहीत. अखेर श्री चरणीने नाबाद ६ धावा करत भारताला सर्वबाद होण्यापासून वाचवले.
सुलीपोर्न लाओमीची घातक फिरकी; थायलंडच्या माऱ्याने उडवली दाणादाण –
थायलंडकडून लेग स्पिनर सुलीपोर्न लाओमी (Suleeporn Laomi) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने ४ षटकांत अवघ्या २६ धावा देत शफाली, प्रतिका आणि रिचा घोष या तिन्ही प्रमुख फलंदाजांना बाद केले. तसेच दीप्ती शर्माला धावचीत करण्यातही तिने महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय सुनिदा चतुरोंगराट्टानाने ३१ धावांत २ विकेट्स घेतल्या, तर थिपाचा पुथावॉन्गने कर्णधार हरमनप्रीतची मोठी विकेट घेत भारताला १६० च्या आत रोखण्यात यश मिळवले.





