MS Dhoni : बीसीसीआय गंभीर-धोनी यांना एकत्र आणणार? माहीला टीम इंडियामध्ये मिळू शकते ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी

MS Dhoni offered Team India mentor role : भारतीय क्रिकेट संघाने 2011 मध्ये 28 वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक जिंकला, तेव्हा महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीर यांच्या भागीदारीने देशाचे स्वप्न पूर्ण केले होते. आता, अनेक वर्षांनंतर ही दिग्गज जोडी पुन्हा एकदा भारताला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये चॅम्पियन बनवण्यासाठी एकत्र येऊ शकते, जर बीसीसीआयचा (BCCI) हा महत्त्वाकांक्षी प्लॅन यशस्वी झाला तर, कोणता आहे प्लॅन? जाणून घेऊया.
सध्या भारतीय संघाचे लक्ष आशिया कपवर असले तरी बीसीसीआयने 2026 टी-20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून यंदा आशिया कप टी-20 स्वरूपात खेळवला जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना एकत्र काम करण्याची संधी मिळू शकते.
धोनीला मिळू शकते मोठी जबाबदारी –
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला 2026 टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचे मार्गदर्शक (मेंटॉर) बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे. धोनी यापूर्वी 2021 मध्ये यूएईत झालेल्या T20 विश्वचषकात मार्गदर्शकाच्या भूमिकेत होता, परंतु त्या वेळी भारतीय संघाला गट साखळीतच बाहेर पडावे लागले होते.
‘क्रिकब्लॉगर’च्या अहवालानुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने पुष्टी केली आहे की, धोनीला पुन्हा ही जबाबदारी देण्याचा विचार आहे. सूत्राने सांगितले, “धोनीला भारतीय क्रिकेट संघाला मार्गदर्शन करण्याची ऑफर देण्यात आली आहे. त्याची रणनीतिक बुद्धिमत्ता, शांत नेतृत्व आणि स्पर्धा जिंकण्याचा अनुभव यामुळे संघाला आणखी एक विश्वविजेतेपद मिळवण्यासाठी तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावता येईल.” मात्र, धोनी हा प्रस्ताव स्वीकारेल का, हा प्रश्न कायम आहे.
गंभीर-धोनी एकत्र काम करणार?
सध्या गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. जर धोनीने मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली, तर या दोन दिग्गजांना एकत्र काम करावे लागेल. गेल्या काही वर्षांत धोनी आणि गंभीर यांच्यातील नात्यात तणाव असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, विशेषतः गंभीरच्या काही वक्तव्यांमुळे. मात्र, मैदानावर दोघांनी नेहमीच एकमेकांचा आदर राखला आहे.
बीसीसीआयचा हा प्लॅन यशस्वी झाल्यास धोनी आणि गंभीर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटला नवी उंची गाठून देण्यासाठी एकत्र येऊ शकतात. चाहत्यांमध्येही या जोडीच्या एकत्र येण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.





