DPL 2025 Controversy : क्रिकेटचं मैदान बनलं ‘कुस्तीचा आखाडा’, नितीश-दिग्वेशच्या राड्यानंतर या खेळाडूंमध्ये धक्काबुकी

DPL 2025 Controversy Video Viral : दिल्ली प्रीमियर लीग 2025 चा हंगाम जसजसा पुढे सरकत आहे, तसतसा त्यातील थरारही वाढत चालला आहे. शुक्रवारी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली लायन्स आणि साउथ दिल्ली सुपरस्टार्स यांच्यातील एलिमिनेटर सामन्यात हा थरार पाहायला मिळाला. या सामन्यात रोमांचाबरोबरच खेळाडूंमध्ये तीव्र वादविवाद आणि झटापटही झाल्याचे दिसून आले. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
नितीश राणा आणि दिग्वेश राठी यांच्यात झाला वाद –
सामन्यादरम्यान प्रथम नितीश राणा आणि दिग्वेश राठी यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली. दिग्वेश राठीच्या एका षटकात नितीश राणाने अप्रतिम रिव्हर्स स्वीप शॉट खेळला, ज्यामुळे चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर गेला आणि मैदानी पंचांनी त्याला षटकार जाहीर केला. नितीशने आपल्या खास शैलीत याचा उत्सव साजरा केला. यानंतर दिग्वेश राठी नितीशला काहीतरी बोलला, ज्यामुळे नितीशचा पारा चढला आणि त्याने दिग्वेशला चांगलेच सुनावले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
It’s all happening here! 🔥🏏
Nitish Rana | Digvesh Singh Rathi | West Delhi Lions | South Delhi Superstarz | #DPL #DPL2025 #AdaniDPL2025 #Delhi pic.twitter.com/OfDZQGhOlr
— Delhi Premier League T20 (@DelhiPLT20) August 29, 2025
अमन भारती आणि सुमित माथुर यांच्यातही जुंपली –
DPL eliminator match🔥🔥🌋🌋#DPLT20 pic.twitter.com/0ag54kzNrP
— Aaditya jha (@aadi___45) August 29, 2025
नितीश-दिग्वेश प्रकरणानंतर सुमित माथुर आणि अमन भारती यांच्यातही तणाव निर्माण झाला. अमन भारतीच्या चेंडूवर कृष्ण यादवने लाँग-ऑफ सीमारेषेवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षक अनमोल शर्माने त्याचा झेल टिपला. यानंतर फलंदा आणि गोलंदाज यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. सुमित माथुर, अमन यादव आणि गोलंदाज अमन भारती यांच्यातील वाद इतका टोकाला गेला की, खेळाडूंमध्ये धक्काबुक्कीही झाली.
नितीशच्या वादळी खेळीच्या दिल्ली लायन्सने मारली बाजी –
या सर्व गदारोळातही वेस्ट दिल्ली लायन्ससाठी नितीश राणाने विस्फोटक फलंदाजी केली. त्याच्या नेतृत्वाखाली वेस्ट दिल्लीने हा एलिमिनेटर सामना 7 गडी राखून जिंकला. साउथ दिल्ली सुपरस्टार्सने प्रथम फलंदाजी करत 201 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, वेस्ट दिल्लीने हे आव्हान 17.1 षटकांत पार केले. नितीश राणाने 55 चेंडूंत नाबाद 134 धावांची खणखणीत खेळी केली, ज्यात 8 चौकार आणि 15 षटकारांचा समावेश होता.





