Short Run Rule : BCCI ने आणला नवा नियम, आता शॉर्ट रनबाबत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार घेणार महत्त्वाचा निर्णय

BCCI Include Short Run Rule in Domestic : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देशांतर्गत क्रिकेटमध्ये शॉर्ट रन संदर्भात नवा नियम लागू केला आहे. या नव्या नियमांनुसार, जर एखाद्या फलंदाजाने मुद्दाम शॉर्ट रन घेतल्यास, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला कोणता फलंदाज स्ट्राइकवर ठेवायचा हे ठरविण्याचा अधिकार मिळेल.
शॉर्ट रन घेण्यामागील कारण आणि नवे नियम –
क्रिकबजच्या अहवालानुसार, फलंदाज मुद्दाम शॉर्ट रन घेतात जेणेकरून अनुभवी फलंदाज स्ट्राइकवर येऊ शकेल. विशेषतः जेव्हा अनुभवी फलंदाज खालच्या क्रमांकावरील खेळाडूसोबत खेळत असतो, तेव्हा तो जास्त वेळ स्ट्राइकवर राहण्याचा प्रयत्न करतो. टी-20 क्रिकेट, फ्रँचायझी क्रिकेट आणि आयपीएलमध्ये असे प्रकार काही वेळा दिसून आले आहेत.
यापूर्वी शॉर्ट रनसाठी नियम अस्तित्वात होते, ज्यामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पाच अतिरिक्त धावा मिळू शकतात आणि सामना रेफरीसमोर सुनावणीचा पर्यायही उपलब्ध होता.
आता बीसीसीआयने नव्या नियमात (धारा 18.5.2) खालील तरतुदी जोडल्या आहेत:
- जर मुद्दाम शॉर्ट रन घेतल्याचे आढळले, तर पंच त्या चेंडूवर मिळालेल्या धावा रद्द करतील.
- क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पाच अतिरिक्त धावा मिळू शकतील.
- लागू असल्यास, नो-बॉल किंवा वाइडचा इशारा दिला जाईल.
- क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला कोणता फलंदाज स्ट्राइकवर राहील हे ठरविण्याचा अधिकार असेल.
- त्यानंतर स्कोअर अपडेट केला जाईल.
- जर पंचांना वाटले की शॉर्ट रन मुद्दाम घेतलेली नाही, तर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.





