Nagar | बारामतीकरांना मुजरा घालत नाही म्हणूनच विरोधक द्वेष करतात

दहिवडी, (प्रतिनिधी) – मी बारामतीला मुजरा करत नाही म्हणूनच विरोधक एक होवून माझा द्वेष करतात. माझी लढाई मतदारसंघात विविध योजनांचे पाणी आणून दुष्काळमुक्तीची आहे.
माझ्या कामात अडथळे आणून पाणी देण्याला विरोध करणाऱ्यांविरोधात मी कायमच लढलो आहे. माझा मतदारसंघ दुष्काळमुक्त होईपर्यंत ही लढाई सुरुच राहील असे प्रतिपादन आ. जयकुमार यांनी केले.
माण तालुक्यातील माता भगिनींच्या सन्मारार्थ दहिवडी येथे भाजपतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दिलीपराव येळगावकर, भगवानराव गोरे, अंकुश गोरे, सोनिया गोरे,
सिध्दनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे, दहिवडी नगरपंचायतीचे पदाधिकारी, भाजपाच्या महिला पदाधिकारी आणि माता भगिनी विक्रमी संख्येने उपस्थित होत्या.
आ. गोरे पुढे म्हणाले, पाणीच नाही तर देणार कुठून असे शरद पवार म्हणायचे. सध्या माझ्या मतदारसंघातील ९० पेक्षा अधिक गावांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून उरमोडीचे पाणी येत आहे.
आता जिहेकठापूरचे पाणी आले आहे. टेंभूसाठी अडिच टीएमसी पाणी मिळवून या योजनेचे काम आठवड्यात सुरु करत आहे. आंधळी उपसा सिंचन योजन योजना पूर्णत्वाला गेली आहे.
पाणीच नव्हते तर हे इतके पाणी आले कुठून असा प्रश्नही त्यांनी शरद पवारांना विचारला. पृथ्वीच्या अंतापर्यंत माण-खटावला पाणी येवू शकत नाही असे म्हणणारे रामराजे जलसंपदा विभागाचे मंत्री होते. त्यांचा अंत व्हायच्या आत माझ्या मतदारसंघात पाणी आले आहे.
मी बारामतीला मुजरा घातला असता तर माझे त्रास कमी झाले असते, मात्र तसे केले असते तर माण-खटावमध्ये पाणी आले नसते. विरोधक माझा द्वेष करत रहातात आणि मी माझे काम करत रहातो.
जिहे-कठापूरचे पाणी आल्याने जनतेला आनंद झाला आहे. साडेबारा हजार कोटींचा निधी आणून मतदारसंघातील ७० टक्के भागात पाणी पोहचवले आहे. पत्येक निवडणूकीत नवीन उद्दिष्ट ठेवून ते पूर्ण केले आहे.
आता टेंभू, औंधसह वीस गावे आणि माणमधील वंचित २९ गावांना पाणी देण्याचे आणि एमआयडिसी उभारुन युवकांच्या हाताला काम देणार आहे. आमच्या सरकारने माता भगिनींच्या सन्मानारार्थ सुरु केलेल्या लाडकी बहीणसह सर्वच योजना कायम सुरु रहाणार आहेत.
माझ्या मंत्रीपदापेक्षा माझ्या मतदारसंघाची दुष्काळमुक्ती मला महत्वाची आहे. येणाऱ्या तीन वर्षात उरलेल्या ३० टक्के भागात पाणी पोहचविणार असल्याचा शब्दही त्यांनी दिला.
अशी गर्दी दुसरीकडे पाहिलीच नाही ….
लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमानिमित्त मी अनेक ठिकाणी जाते, मात्र दहिवडीसारखी माता – भगिनींची अलोट गर्दी मी कुठेच पाहिली नाही. हजारो बहिणींनी आ. जयकुमार गोरे यांना राख्या बांधल्या आहेत. त्यांनी सर्वांना भाऊबीज देवून सन्मानीतही केले असल्याचे सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सांगितले.





