Mhaswad Municipal Election: म्हसवड पालिका निवडणुकीत सूर्यवंशी दाम्पत्याचा नवा इतिहास

प्रभात वृत्तसेवा
दहिवडी – म्हसवड पालिकेच्या निवडणुकीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एकहाती सत्ता मिळवताना सर्वच ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आणून विरोधकांना व्हाईट वॉश देताना नवा इतिहास रचला आहे. या नव्या इतिहासासोबतच येथील सूर्यवंशी दांपत्यानीही निवडून येत आणखी एक इतिहास रचला आहे. अनेक राजकिय स्थित्यांतरे पाहणाऱ्या या पालिकेने यंदा झालेल्या पालिका निवडणुकीत नवीन राजकीय बदल पाहिला आहे.
तो बदल घडवण्याची किमया येथील युवराज सूर्यवंशी व स्नेहल सूर्यवंशी या दांपत्याने केली आहे.पालिकेच्या इतिहासात प्रथमच शहरातील पती, पत्नी ने एकत्रित निवडणूक लढवण्याचा आणि निवडून येण्याचा सम्मान पटकावताना नवा इतिहास रचला आहे. अर्थातच हा नवा इतिहास रचताना मंत्री गोरे यांचेच त्यांना मोठे पाठबळ मिळाल्याचे हे दांपत्य जाहीरपणे सांगत असले तरी एकाच पालिकेत एकाच पार्टीतून पती,
पत्नी निवडून येण्याची ही पालिका इतिहासातील पहिलीच वेळ असल्यानेच सूर्यवंशी दांपत्याचे विशेष कौतुक व अभिनंदन शहरात होत आहे.वास्तविक पाहता निवडणुक जाहीर झाल्यापासुन सूर्यवंशी यांच्यातील कोणाला एकाला उमेदवारी मिळेल असे बोलले जात होते. मात्र, नेहमीच धक्कातंत्र देणाऱ्या ना. गोरे यांनी यावेळी सूर्यवंशी पती, पत्नी या दोघांनाही उमेदवारी जाहीर केल्याने अनेकांचे डोळे विस्फारले.
अनेकांना हा निर्णय अत्यंत चुकीचा वाटला तर अनेकजण नाराजही झाले. मात्र मंत्री गोरे यांनी एकदा शब्द दिला की ते प्रमाण बनते हे ही येथील जनतेने अनुभवलेले आहे. मंत्री गोरे यांनी दिलेला शब्द खरा करुन दाखवण्यासाठी मग युवराज सूर्यवंशी व स्नेहल सूर्यवंशी या पती, पत्नी ने अक्षरशा पायाला भिंगरी बांधत प्रचाराची अशी काही राळ उडवून दिली होती.
एकीकडे मंत्री गोरे यांनी पालिकेवर सत्ता स्थापन करताना २१/० ने विरोधकांना व्हाइट वॉश देत नवा इतिहास रचला तर याच निवडणुकीत सूर्यवंशी दांपत्यानीही वेगवेगळ्या प्रभागातुन निवडून येत पालिका निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी केल्याने सन २०२५ ही पालिका निवडणुक ही सर्वांसाठी अविस्मरणीय अशी राहिल .





