Baramati News | इंदोरच्या धर्तीवर बारामतीचा विकास – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रभात वृत्तसेवा
बारामती – नटराज नाट्य कला मंडळाने उभारलेला राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा आणि फडकणारा तिरंगा ध्वज हा नागरिकांना राष्ट्र प्रेमाची आठवण करुन देईल. स्वातंत्र्यदिनी मिळालेल्या या अमूल्य देणगीची जतन करण्याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.नटराज नाट्य कला मंदिराच्या परिसरात सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारलेल्या ३० मीटर उंच राष्ट्रध्वज स्तंभाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार सुनेत्रा पवार, नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, मुख्याधिकारी पंकज भुसे, रवींद्र लाड, आदी मान्यवर आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, कवीवर्य मोरोपंत यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या बारामती शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात विविध देशभक्त आणि क्रांतिकारकांमध्ये बारामतीकरांचा सहभाग होता.
यावेळी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तीन हत्ती चौकाला ‘तिरंगा सर्कल’ असे नाव दिले असून नामफलकाचे पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी ‘मेरा भारत महान’ देशभक्तीपर कार्यक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद लाभला. यावेळी अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, पत्रकार, नागरिक उपस्थित होते.
नटराजचे सांस्कृतिक मोलाचे योगदान..
आज शहरात नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारलेला राष्ट्रध्वज स्तंभ बारामतीकरांकरिता अभिमानाची बाब आहे. स्तंभ उभारण्याकरिता मंडळाने केलेल्या प्रयत्नाबद्दल कौतुक करुन हा स्तुत्य असा उपक्रम आहे. ४५ वर्षात मंडळाचे सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक, ऐतिहासिक, भावस्पर्शी कथनावरील नाटकांचा समावेश असलेले तीन दिवसीय नाट्य महोत्सवाचे सुद्धा आयोजन केले आहे. यातून नागरिकांना दर्जेदार कलाविष्कार पाहायला मिळाला असेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
इंदोरच्या धर्तीवर शहराचा विकास..
इंदोर शहराच्या धर्तीवर बारामती शहराचा विकास करण्याचा मानस व्यक्त करुन पवार म्हणाले, शहरात सीसीटीव्ही यंत्रणा, वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात येणार आहे. शहरात अनधिकृत जाहिरात फलक लागणार नाही, स्वच्छता राहिली पाहिजे, कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राखली पाहिजे, याबाबत दक्षता घ्यावी. याकरिता नागरिकांनी प्रशासनाच्या वतीने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे.
डॉ. राठोड यांना विशेष सेवा पदक प्रदान..
उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांना गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक आणि बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्याकरिता केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल राज्य शासनाच्या वतीने ‘विशेष सेवा पदक’ जाहीर केले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते डॉ. राठोड यांना विशेष सेवा पदक प्रदान करुन त्यांनी गडचिरोली येथे केलेल्या कार्याचे कौतुक केले.





