Baramati News : बारामतीत पहिल्याच पावसात दाणादाण! सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक ठिकाणी झाडे कोसळली, रस्त्यांना आले तळ्याचे स्वरूप
Baramati News : गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या बारामतीकरांना आज सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने मोठा दिलासा दिला.

Baramati News : बारामती शहरात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. उन्हाच्या तीव्र झळांनंतर आलेल्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला असला, तरी पहिल्याच पावसात शहरातील अनेक ठिकाणी गंभीर समस्या निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील भिगवण रोड, सातव चौक, इंदापूर रोडवर झाडे कोसळली. (Baramati News)
विशेषतः बारामती-भिगवण रोड परिसरात पावसाचा सर्वाधिक फटका बसला. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या, तर काही ठिकाणी मोठी झाडेही कोसळली. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. (Baramati News)
वाहनांच्या लांब रांगा लागल्या. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही भागांमध्ये रस्ते आणि नाले यामधील फरक ओळखणेही कठीण झाले होते. नागरिकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Baramati News)
स्थानिक नागरिकांच्या मते, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि पाणी निचऱ्याच्या उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात पहिल्याच जोरदार पावसात शहरातील परिस्थिती बिघडल्याने प्रशासनाच्या तयारीबाबत शंका निर्माण होत आहे. (Baramati News)
जर पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर आगामी काळात मुसळधार पावसादरम्यान शहरातील परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते याची दखल नगरपालिका प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. (Baramati News)





