Rain Updates : निमगाव केतकी पंचक्रोशीत मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा
Rain Updates:

Rain Updates : निमगाव केतकी, ता. इंदापूर – निमगाव केतकी व पंचक्रोशी परिसरात शुक्रवारी सायंकाळी सुमारे तासभर मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. पावसामुळे शेतांमध्ये पाण्याची चांगली साठवण झाली असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. तसेच परिसरातील अनेक भागांत वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. पाऊस सुरू होताच लहान मुले आणि युवकांनी पावसाचा आनंद लुटला.
दरम्यान, या पावसामुळे परिसरातील तलाव, ओढे आणि विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. संभाव्य अडचणी टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर –
दरम्यान, केरळमध्ये धडकल्यानंतर मान्सून आता गोव्यात दाखल झाला असून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचलाय. पुढील दोन ते तीन दिवसांत तो राज्यात प्रवेश करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. आज राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यंदा मान्सून तीन दिवस उशिराने धावत असला, तरी पुढील ४८ तासांत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिलीय.





