Baramati gutkha raid: बारामतीत खळबळ! गुटखा माफियांचे कर्नाटक कनेक्शन उघड; पोलिसांची मोठी कारवाई
Baramati gutkha raid : बारामतीतील जळोची परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ५५ हजारांच्या प्रतिबंधित गुटख्यासह दुकानदाराला बेड्या.

Baramati gutkha raid – सार्वजनिक आरोग्यास घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधात बारामती शहर पोलिस व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत रु. ५५ हजार २४४ किंमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून दुकान मालकाला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या विक्री आणि साठवणुकीवर बंदी घातलेली असतानाही बारामतीतील जळोची परिसरात हा साठा आढळून आला.
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी संदीप दिगंबरराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 233/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कारवाईत प्रीमियम आरएमडी पानमसाला, एम सेंटेड तंबाखू, डायरेक्टर पान मसाला, विमल पानमसाला, व्ही-1 तंबाखू, गुलाम गुटखा, बाजीगर गुटखा, के.आर.1000 गुटखा यांसह विविध बँडचा एकूण रु. 55,244 किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.
कर्नाटकातून माल आणल्याची कबुली
चौकशीदरम्यान दुकान मालक गणेश गुरुशांताप्पा गुरुभेट्टी (वय 38, रा. बारामती) याने हा प्रतिबंधित माल कर्नाटक राज्यातून आणल्याची माहिती दिली. मात्र, त्याबाबत कोणतेही वैध खरेदी बिल किंवा कागदपत्रे सादर करता आली नाहीत. त्यामुळे संबंधित साठा तात्काळ जप्त करण्यात आला.
पुरवठा साखळीचा शोध सुरू
या प्रकरणात आरोपी गणेश गुरुभेट्टी याला १० जून रोजी अटक करण्यात आली आहे. केवळ किरकोळ विक्रेत्यावर कारवाई न करता या प्रतिबंधित मालाचा पुरवठादार, वाहतूकदार, वितरक आणि उत्पादक यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. आर्थिक व्यवहार, वाहतूक व्यवस्था आणि राज्यातील चोरट्या व्यापाराच्या संपूर्ण साखळीचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जळोचीतील दुकानावर छापा
९ जून रोजी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी संदीप शिंदे, सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे आणि पंच यांच्या उपस्थितीत जळोची येथील मे. धानेश्वरी किराणा अँड जनरल स्टोअर्स येथे तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान दुकानात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.






