Malegaon News : शेतात माती टाकण्यासाठी ६ हजारांची लाच; वनपाल ACBच्या जाळ्यात
Malegaon News : ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बारामती वनपरिक्षेत्रातील करंजे राऊंडचे वनपाल (वर्ग-३) जहीर सिराज शेख (वय ४७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Pune) हॉटेल शिवकृपा समोर सापळा रचून रंगेहात जेरबंद केले.

Malegaon News : शेतात माती टाकण्याचे काम सुरू ठेवण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील ६ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) पुणेच्या पथकाने माळेगाव (बारामती) येथे सापळा रचून रंगेहात अटक केली आहे. (Malegaon News)
जहीर सिराज शेख (वय ४७, पद – वनपाल, वर्ग-३, करंजे राऊंड ऑफिसर, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, बारामती) असे लाच घेणाऱ्या आरोपीचे नाव आहे. (Malegaon News)
याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांची कोन्हाळे खुर्द येथे ४ हेक्टर शेतजमीन असून पावसामुळे त्यातील माती नीरा नदीत वाहून गेल्यामुळे ते नदीपात्रातील माती आपल्या शेतात टाकत होते. यादरम्यान २६ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपी वनपाल जहीर शेख यांनी तक्रारदारांचे काम बंद पाडले आणि ही जागा फॉरेस्टच्या मालकीची असल्याचे सांगून कारवाईची भीती दाखवली. (Malegaon News)
कोणतीही कारवाई न करता काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी आरोपी वनपाल जहीर शेख यांनी त्यांच्या सहकारी भुमरे मॅडम आणि स्वतःसाठी १०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्या दिवशी ४,००० रुपये अगोदरच स्वीकारण्यात आले होते व उर्वरित ६,००० रुपयांची मागणी करून ती रक्कम दिल्याशिवाय काम सुरू करू नका असे सांगितले होते. (Malegaon News)
तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असता, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी एसीबीने केलेल्या पडताळणीदरम्यान आरोपीने पंचांसमोर १०,००० रुपयांची लाच मागितल्याचे आणि यापूर्वी ४,००० रुपये घेतल्याचे मान्य केले. (Malegaon News)
त्यानंतर आज दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सापळा कारवाई दरम्यान हॉटेल शिवकृपा, आय.टी.आय. माळेगावासमोर, बारामती येथे ६,००० रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी जहीर शेख यांना दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी रंगेहात ताब्यात घेण्यात आले. (Malegaon News)
याप्रकरणी आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये माळेगाव पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणेचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस नाईक प्रवीण तावरे, महिला पोलीस शिपाई वैशाली माकर आणि श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अविनाश चव्हाण यांच्या पथकाने केली आहे. (Malegaon News)
भ्रष्टाचारासंबंधी कोणतीही माहिती किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी एसीबीच्या पुणे कार्यालय किंवा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Malegaon News)





