Cyber Fraud : एका बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची सायबर गुन्हेगारांनी ९७.७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठ्या परतव्याचे मिळेल असे आमिष दाखवून या अधिकाऱ्याला गंडा घातला आहे. तक्रारदार हे चेंबूर येथील ४४ वर्षीय रहिवासी असून, ते एका अग्रगण्य बँकेत सहाय्यक उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. (Cyber Fraud) आरोपींनी पीडित व्यक्तीचा विश्वास संपादन करण्यासाठी एका नामांकित गुंतवणूक सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी असल्याचे भासवले आणि एका बनावट मोबाईल ॲप्लिकेशनवर जास्त परतावा दर्शवला. फेब्रुवारी महिन्यात पीडित व्यक्तीला एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप लिंक आली आणि त्यानंतर त्यांना काही ग्रुप्समध्ये जोडले गेले. फोन करणाऱ्या एका महिलेने आपण एका गुंतवणूक सल्लागाराची सहाय्यक असल्याचे सांगितले. (Cyber Fraud) जेव्हा पीडित व्यक्तीने त्या नावाची ऑनलाइन पडताळणी केली, तेव्हा ते नाव एका नामांकित संस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्याचे असल्याचे दिसून आले. त्यानंतर, या सायबर गुन्हेगारांनी त्या बँक अधिकाऱ्याला एक मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास राजी केले. त्या ॲपवर आपला मोबाईल क्रमांक नोंदवून आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. सुरुवातीला त्यांनी ५०,००० रुपयांची गुंतवणूक केली आणि ॲपवर त्यांना पाच टक्के परतावा मिळाल्याचे दिसून आले. (Cyber Fraud) यामुळे प्रोत्साहित होऊन, त्यांनी आरोपींच्या सल्ल्यानुसार मोठ्या रकमांची गुंतवणूक करणे सुरूच ठेवले. आरोपींनी त्यांना वेगवेगळ्या फोन क्रमांकांवरून संपर्क साधला आणि विविध बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले. एफआयआरनुसार फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत त्यांनी एकूण ९७.७८ लाख रुपये हस्तांतरित केले.