Share Market Fraud – शेअर मार्केटमधील आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी राजस्थान आणि महाराष्ट्रातून सात जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींशी संबंधित बँक खात्यांमधील सुमारे १ कोटी ८० लाख रुपये पोलिसांनी होल्ड केले आहेत. अभय बाबासाहेब पाटील (वय ३४, रा. कोल्हापूर), शिवतेज राजेंद्र पोटे (वय ३०, रा. वाघोली, पुणे), महेश करबसपा उडचणे (वय २८, रा. दहिसर पूर्व, मुंबई), राहुल बहादुरप्रसाद मौर्य (वय २४, रा. दहिसर पूर्व, मुंबई), युवराज ऊर्फ संतोष सतीश मुदलीयार (वय ३५, रा. लोहगाव, पुणे), पंकज मंगु गिरीगोस्वामी (वय २४, रा. राजस्थान) आणि प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी (वय २३, रा. राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे सांगून तक्रारदाराकडून वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी आरोपींनी पैसे घेतले. मात्र कोणताही परतावा न देता ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक केली.आरोपींनी विविध बँक खात्यांद्वारे व्यवहार केले होते. तपासादरम्यान अॅक्सिस बँकेच्या एका खात्यात २१ लाख रुपये जमा झाल्याचे आढळून आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी कोल्हापूर येथे तपास करत अभय पाटील याला अटक केली. त्यानंतर या प्रकरणातील शिवतेज पोटे याला वाघोली येथून ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासात आरोपींनी सायबर गुन्ह्यांसाठी १५ ते २० बँक खाती वापरल्याचे उघड झाले. दरम्यान, कोटक बँकेतील आणखी एका खात्यात २५ लाख रुपये जमा झाल्याचे समोर आले. या प्रकरणात महेश उडचणे आणि राहुल मौर्य यांना मुंबईतील दहिसर येथून अटक करण्यात आली. तसेच तपासादरम्यान पुणे व राजस्थानमधून इतर आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आव्हाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकाडे व त्यांच्या पथकाने केली.