बंजारा समाज हा कधीच आदिवासी होऊ शकत नाही : मंत्री नरहरी झिरवाळ

Narahari Zirwal : बंजारा समाज हा कधीच आदिवासी होऊ शकत नाही, आदिवासी होण्यासाठी आदिवासीच्या पोटी जन्माला यावे लागते, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी मंत्र्यांने बंजारा समाजाच्या या मागणीला विरोध दर्शवला आहे.
एकीकडे मराठा समजासाठी हैदराबाद गॅझेटचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. त्यामुळे ओबीसी समाजातील नेत्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. यात बंजारा समाजाने देखील आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी मागणी केली आहे. यामुळे बंजारा समाज कोणत्या अधिकारात आदिवासींमध्ये आरक्षण मागत आहे असा सवालही झिरवाळांनी उपस्थित केला.
हैदराबाद गॅझेटिअरचा आधार घेत बंजारा समाज एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र, बंजारा समाजाच्या मागणीला आदिवासी समाजाकडूनही तीव्र विरोध होत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी वरील विधान केले आहे.
शुक्रवारी दि. २६ सप्टेंबर रोजी त्यांनी नाशिक येथे आयोजित आदिवासींच्या न्याय्य हक्क व संविधान संरक्षणासाठी आदिवासींची महापंचायत झाली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री नरहरी झिरवाळ?
याचा आम्ही अभ्यास केला असून या संदर्भात आम्ही बैठक घेतली. यात समाजातील अनेक तज्ज्ञ लोक सहभागी झाले होते. निवृत अधिकाऱ्यांनीही याचा अभ्यास केला आहे. बंजारा समाज हा कधीच आदिवासी होऊ शकत नाही. या समाजाला काही ठिकाणी धान्य वाहून नेणारा समाज म्हटले जाते. हैदराबाद गॅझेटिअरचा ते आधार घेत आहेत परंतु यात तशी कुठेही स्पष्टता नसल्याचे झिरवाळ म्हणाले.





