Narhari Zirwal : बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर; थेट परवाने होणार रद्द; मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

मुंबई : बनावट पनीर किंवा चीज अॅनालॉग वापरणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे. पनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, पनीर हा खाद्यपदार्थामधील आवडता पदार्थ असून त्याला बाजारात मोठी मागणी असते. विशेषतः लहान मुलांमध्ये पनीरची क्रेझ अधिक आहे. मात्र काही ठिकाणी बनावट पनीर अथवा ‘चीज अॅनालॉग’ वापरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत आढळून येते. अशा प्रकारे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या पनीर विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६, तसेच २०११ आणि २०२२ मधील नियमानुसार ही कारवाई केली जाईल.
अन्न सुरक्षा आणि मानके (लेबलिंग व डिस्प्ले नियमन) 2020 च्या नियमांनुसार, विक्री होणाऱ्या अन्नपदार्थातील सर्व घटक व पोषणमूल्यांची माहिती ग्राहकांसमोर मांडणे बंधनकारक आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, कॅटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांना आपल्या मेनू कार्ड्स, डिस्प्ले बोर्ड्स आणि ऑर्डर मशीनवर अचूक माहिती देणे अनिवार्य आहे.
अन्न व औषध प्रशासन विभाग ग्राहकांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. अन्नाच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. रेस्टॉरंट, हॉटेल व फास्ट फूड व्यावसायिकांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.





