Bangladesh Protests | बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. ‘इन्कलाब मंच’चे तरुण नेते शरीफ उस्मान हादी यांचा मृत्यू झाल्यानंतर बांग्लादेशात संतापाची लाट उसळली आहे १२ डिसेंबर रोजी शरीफ उस्मान हादी यांच्यावर प्रचारादरम्यान अज्ञातांनी गोळीबार केला होता. बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये ही घटना घडली होती. हादी यांच्यावर सिंगापूरमधील रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आंदोलकांनी अधिकाऱ्यांवर हादीची सुरक्षा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. दगडफेक आणि जाळपोळ ढाकामधील ‘जातीया छात्र शक्ती’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बांगलादेशचे गृह खात्याचे सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांच्या घराला आग लावली. तसेच बांगलादेशातील सर्वाधिक खप असलेल्या वृत्तपत्रांपैकी एक ‘प्रोथोम अलो’ या वृत्तपत्राच्या कार्यालयाला आग लावण्यात आली. त्यावेळी अनेक पत्रकार व नागरिक इमारतीत अडकल्याची माहिती समोर आली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना तसेच आवामी लिग विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली. बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्तेविरोधात आंदोलन उभं करण्यात शरीफ उस्मान हादीने प्रमुख भूमिका बजावली होती. ढाक्यामध्ये उच्चस्तरीय बैठक बोलवली युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेश अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी शोक व्यक्त केला आहे. शुक्रवारी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आंदोलकांनी कायदा हातात घेऊ नये, हादी यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. दरम्यान, बांग्लादेशात सुरु झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांनी ढाक्यामध्ये उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे. हादीचा मृत्यू कसा झाला? ढाकाच्या बिजॉयगनर भागात निवडणूक प्रचारादरम्यान 12 डिसेंबरला अज्ञात हल्लेखोरांनी हादीच्या डोक्यात गोळी झाडली. गंभीर जखमी अवस्थेत हादीला ढाक्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यानंतर 15 डिसेंबरला एअर एम्बुलेन्सने त्यांना सिंगापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बांग्लादेश परराष्ट्र मंत्रालय आणि सिंगापूरच्या अधिकाऱ्यांनी हादीच्या मृत्यूची पृष्टी केली आहे. Bangladesh Protests | हेही वाचा: PMC Election: महाविकास आघाडी म्हणूनच लढू! काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या मुलाखतींमध्ये इच्छुकांचा सूर