Mamata Banerjee – जोपर्यंत मी येथे आहे तोपर्यंत एकाही बंगालीला डिटेंशन कॅम्पमध्ये पाठवले जाणार नाही किंवा बांगलादेशला पाठवले जाणार नाही आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. बंगालमध्ये एसआयआरची प्रक्रिया वेगाने राबवली जात असून त्याच्या निषेधार्थ मालदा येथे आयोजित केलेल्या रॅलीमध्ये ममता बोलत होत्या. ममतांनी रॅलीत सोनाली खातुनचा मुद्दाही उपस्थित करताना सांगितले की सोनाली खातुन यांना बांगलादेशी ठरवण्यात आले आणि बंगाली बोलल्यामुळे त्यांना सीमेपलीकडे पाठवण्यात आले. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने सोनाली खातुन यांना भारतात परतण्याची परवानगी दिली असल्याकडे लक्ष वेधत त्यांनी केंद्रातील एनडीए सरकारवर टीकास्त्र सोडले. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी विशेष मतदार पडताळणी मोहीम अर्थात एसआयआर सुरू करण्याच्या कटामागे गृहमंत्री अमित शहा आहेत असा आरोप ममतांनी केला आणि बंगालमध्ये एसआयआर सुरू करून भाजपने स्वतःची कबर खोदली असल्याचा दावा केला.