ढाका/इस्लामाबाद: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आणि त्यांचे संभाव्य प्रत्यार्पण हा पूर्णपणे बांगलादेशचा अंतर्गत मामला असल्याचे मत पाकिस्तानने व्यक्त केले आहे. पाकिस्तानने या प्रकरणावर थेट भाष्य करणे टाळले असून, हा बांगलादेशच्या संविधान आणि कायद्याचा भाग असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण – शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हा बांगलादेशचा अंतर्गत मामला आहे. बांगलादेशचे स्वतःचे संविधान आणि कायदे आहेत.” अंद्राबी यांनी पुढे भर दिला की, बांगलादेशच्या नागरिकांमध्ये त्यांच्या लोकशाही आणि संवैधानिक प्रक्रियेनुसार स्वतःच्या समस्या सोडवण्याची पूर्ण क्षमता आहे. नेमके प्रकरण काय? या आठवड्यात बांगलादेशमधील ‘इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल’ने (International Crime Tribunal) माजी पंतप्रधान शेख हसीना यांना “मानवतेविरुद्धचे गुन्हे” (Crimes against humanity) आणि निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार केल्याच्या आरोपाखाली मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. शेख हसीना सध्या भारतात आहेत. जुलै २०२४ मध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणावरून बांगलादेशात विद्यार्थी आंदोलन सुरू झाले होते, ज्याचे रूपांतर देशव्यापी राजीनामा आंदोलनात झाले. यानंतरच शेख हसीना यांनी देश सोडून भारतात आश्रय घेतला होता.