प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकांसाठी महाविकास आघाडी म्हणून लढल्यास महापालिकेत मोठा फायदा होईल. त्यामुळे एकत्र लढण्याचाच विचार व्हावा, अशी भावना महापालिका निवडणुकीसाठी काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षांच्या इच्छुकांच्या मुलाखतीत उमटल्याचे पाहायला मिळाले. तर दोन्ही पक्षांकडे मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या असून, त्यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारीची मागणी पक्षाकडे करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. तर काॅंग्रेसच्या दोन दिवसांच्या मुलाखती संपल्या असून, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षांकडूनही एकाच दिवसात विधानसभानिहाय आपल्या मुलाखती संपविल्या आहेत. त्यामुळे आता दोन्ही पक्ष आघाडीच्या चर्चेनंतर जागा निश्चित करून त्यानंतरच आपले उमेदवार जाहीर करणार आहेत. राष्ट्रवादीच्या मॅरॉथाॅन मुलाखती राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षांच्या वतीने उमेदवारांची संख्या जास्त असल्याने तसेच महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याने पक्षाकडून गुरुवारी दिवसभरात सर्व मुलाखती घेण्यात आल्या. पक्षाकडून सकाळी ११ पासून विधानसभानिहाय या मुलाखती घेण्यात आल्या त्यात, सुमारे २४२ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले. यावेळी पक्षाकडून इच्छुकांना प्रभागनिहाय राजकीय स्थिती, महाविकास आघाडीची स्थिती, उमेदवारांचे पॅनल कसे असावे, असे प्रश्न विचारण्यात आले. यावेळी अनेक इच्छुकांकडून लोकसभा निवडणुकीप्रमाणे तीनही पक्षांनी महाविकास आघाडी म्हणूनच भाजपला रोखावे, अशी भूमिका इच्छुकांकडून मांडण्यात आली. त्याच वेळी अनेक प्रभागांमध्ये पक्षाकडे दोन ते तीनच उमेदवार तर काही प्रभागांमध्ये १० पेक्षाही अधिक इच्छुक मुलाखतीसाठी आलेले असल्याचे पाहायला मिळाले. रात्री उशिरापर्यंत या मुलाखती सुरू होत्या. काॅंग्रेसच्या मुलाखती संपल्या काॅंग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखतीही गुरुवारी संपल्या. पक्षाकडून बुधवारी प्रभाग १ ते २० मधील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी प्रभाग २१ ते ४१ मधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सलग दिवशी काॅंग्रेस भवनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. त्यात, माजी नगरसेवकांनीही मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी काॅंग्रेसच्या इच्छुकांनीही आघाडी म्हणून लढल्यास फायदा होणार असल्याचे सांगत सर्वांना समान न्याय मिळावा तसेच जागा वाटपात पक्षाला तसेच निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी मागणी करताना इच्छूक दिसून आले. या मुलाखतींचा अहवाल राज्याच्या निवड समितीकडे पाठविण्यात येणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले.