Nagpur Violence : नागपूर दंगलीचे बांगलादेश कनेक्शन? ‘ती’ फेसबुक पोस्ट पोलिसांच्या हाती

Nagpur Violence : नागपूर दंगलींच्या तपासादरम्यान एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नागपुरात झालेल्या हिसाचारात बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चिथावणीखोर पोस्टच्या तपासणीदरम्यान पोलिसांना नागपूर दंगलीचे बांगलादेशाशी कनेक्शन असल्याचे निदर्शनास आले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर पोलीस आणि गुप्तचर संस्था सक्रिय झाल्या असून तपास सुरू केला आहे.
“अभी तो सिर्फ अटॅक हुआ है” अशा आशयाची एक पोस्ट पोलिसांना सोशल माध्यमातून मिळाली होती. त्या सगळ्याचा तपास घेतला असता त्या पोस्टचा संबंध बांगलादेशी भागातून असल्याचा समोर आले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवली आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणाच्या त्या सगळ्या पोस्ट आयपी अॅड्रेस तपासले असता त्या माध्यमातून या बाबींचा शोध लागला. त्यामुळे देशाची अखंडता आणि एकता भंग करण्याचा प्रयत्न असल्यामुळे कलम 152 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
नागपूरमधील या राडा प्रकरणात फहीम खान हे नाव समोर आले आहे. फहीम खान या सगळ्या हिंसाचारामागचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहे. या फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहीम खानसह 50 आरोपींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर सायबर पोलिसांनी मध्यरात्री हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे मालेगाव कनेक्शन?
नागपूरच्या दंगलीचा मास्टर माईंड फहीम खानच मालेगाव कनेक्शन समोर आले आहे. फहीम खान पाच महिन्यांपूर्वी मालेगावात येऊन गेल्याची माहिती मिळत आहे. फहीम खान मालेगावात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विधानसभा निवडणूक वेळी त्याने त्याच्या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात पक्षाची बांधणी केली होती. MDP पार्टी काढून मालेगाव मध्य मधून मोहम्मद फरान शकील अहमद यांनी निवडणूक लढवली होती.
कोण आहे फहीम खान?
फहीम खान मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पार्टीचा शहर अध्यक्ष आहे. फहीम खान 38 वर्षांचा असून त्याचं दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणूक फहीम खानने निवडणूक देखील लढवली होती. मात्र त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी त्याला 1 हजार 73 मतं मिळाली होती. फहीम खानने नागपुरात जमाव जमवल्याचा आरोप केला जात आहे.





