नागपूर दंगल पूर्वनियोजित असेल तर सरकार काय हजामत करत होतं का? जयंत पाटलांनी फडणवीसांना कोंडीत पकडलं

मुंबई: “नागपूरची दंगल पूर्वनियोजित होती असं सरकार म्हणतं, मग तुम्ही काय हजामत करत होता का?” असा थेट सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारला विचारला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. नागपूरसारख्या शांत शहरात दंगल कशी घडते आणि राज्यात दंगलींची संख्या का वाढतेय, यावरून त्यांनी सरकारची झोड उठवली.
नागपूर दंगल माहिती होती, मग कारवाई का नाही?
जयंत पाटील म्हणाले, “राज्यात गेल्या काही काळात १२ दंगली झाल्या आहेत. दंगलींची कारणं शोधणं गरजेचं आहे. सरकार स्वतःच सांगतंय की नागपूरची दंगल ही पूर्वनियोजित कटाचा भाग होती. जर हे माहिती होतं, तर सरकार काय करत होतं? नागपूरचे लोक शांत स्वभावाचे आहेत, तरीही तिथे दंगल कशी काय घडते? महाराष्ट्राला सावरायची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी.” त्यांनी सरकारमधील नेत्यांना चुकीच्या गोष्टींचं समर्थन करू नये, असा टोलाही लगावला. “नाहीतर दावोसमध्ये झालेले १५ लाख कोटींचे करार दुसरीकडे जातील,” असा इशाराही त्यांनी दिला.
ढसाळांचं साहित्य वाचायला द्या! –
नामदेव ढसाळ यांच्याबद्दल अनभिज्ञ असलेल्या अधिकाऱ्यावरही पाटील यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, “नामदेव ढसाळ कोण आहेत, असा सवाल करणाऱ्या अधिकाऱ्याला अटक करा आणि त्यांना ढसाळांचं साहित्य वाचायला द्या, अशी आमची मागणी होती. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार आहेत. त्याच्या आईला कोणता न्याय देणार? अधिवेशन संपत आलंय, आता सोमनाथच्या कुटुंबाला न्याय द्यावा लागेल.”
कोरटकरला संरक्षण का? –
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर प्रकरणावरही जयंत पाटील यांनी सरकारला धारेवर धरलं. “प्रशांत कोरटकर कोण आहे? तो छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतो. त्याला अटक करायला इतका विलंब का झाला? शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकरला संरक्षण का दिलं गेलं? त्याची अटक झाली असेल तर सरकारने स्पष्ट करावं. तो झक मारल्यानंतरही त्याला सुरक्षा का मिळाली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, कुणाल कामरावर खटला दाखल झाला, पण सोलापूरकरवर का नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. “महाराज आणि इतर महापुरुषांवर बोलणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी,” असंही ते म्हणाले.




