Nigar Sultana Handshake : भारत-श्रीलंका मॅचआधी मोठा राडा! निगार सुलतानाच्या ‘त्या’ कृतीने क्रीडाविश्वात वादंग; आशियाई स्पर्धेनंतर फैसला
Nigar Sultana Handshake : बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरशी हस्तांदोलन न केल्याने वाद पेटला आहे.

Nigar Sultana Refuses Handshake With Harmanpreet Kaur BCB Clarification Asia Cup : महिला आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत भारताकडून ४० धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर बांगलादेश संघाच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. या सामन्यापूर्वी नाणेफेकीच्या वेळी बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने (Nigar Sultana) भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरशी पारंपरिक हस्तांदोलन (Handshake) करण्यास स्पष्ट नकार दिला होता. या घटनेवरून आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार वाद निर्माण झाल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) खुलासा केला असून, हा निर्णय बोर्डाचा नसून निगारचा वैयक्तिक होता असे स्पष्ट केले आहे.
हस्तांदोलन न करण्याचा निर्णय वैयक्तिक; बीसीबीचा खुलासा
या प्रकरणावर पडदा टाकताना बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या महिला समितीचे अध्यक्ष रफिकुल इस्लाम बाबू यांनी स्पष्ट केले की, निगार सुलतानाने घेतलेला हा निर्णय तिचा स्वतःचा होता. बीसीबीने भारताच्या विरोधात अशी कोणतीही ‘नो हँडशेक’ पॉलिसी लागू केलेली नाही. खेळ हे जगाला एकत्र आणण्याचे माध्यम असून बीसीबी भारतासह सर्व क्रिकेट खेळणाऱ्या देशांसोबत मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण संबंध राखण्यावर विश्वास ठेवते, असे सांगत बोर्डाने निगारच्या या कृतीपासून स्वतःला पूर्णपणे वेगळे केले आहे.
भारत-पाक तणावाचे सावट; निगार सुलतानाची खोडसाळ कृती भोवणार?
BCB steers clear of Nigar Sultana’s handshake row, but her captaincy future hangs in balance#AsiaCup2026 #INDWvBANW pic.twitter.com/qxSRrv9lQn
— Cricbuzz (@cricbuzz) September 12, 2026
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावाचा परिणाम क्रिकेट मैदानावरही पाहायला मिळाला होता, जिथे भारतीय कर्णधारांनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले होते. त्याच पार्श्वभूमीवर निगार सुलतानाने भारतीय संघाविरुद्ध हेच पाऊल उचलल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, मैदानावर क्रीडाभावना न दाखवणे आता थेट निगारच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धेत होणार फैसला; गैरवर्तणुकीच्या तक्रारींमुळे पद धोक्यात –
या वादग्रस्त घटनेनंतर निगार सुलतानाच्या कर्णधारपदावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. बोर्डाला निगारविरुद्ध गैरवर्तणुकीच्या काही अंतर्गत तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. रफिकुल इस्लाम बाबू यांनी स्पष्ट केले की, आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मधील संघाची कामगिरी आणि तिच्याविरोधातील तक्रारींचा सर्वंकष आढावा घेतल्यानंतरच तिच्या कर्णधारपदाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.





