Baby Girl Found In Basket : निर्दयतेचा कळस! बास्केटमध्ये आढळली ७ महिन्यांची चिमुरडी; माले येथील धक्कादायक प्रकार
Baby Girl Found In Basket : माले (ता. मुळशी) येथे रस्त्याशेजारील बास्केटमध्ये ७ महिन्यांची बालिका आढळली; स्थानिक रहिवाशांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण.
Updated On:

Baby Girl Found In Basket – मुळशी तालुक्यातील माले येथे रस्त्याच्या कडेला एका बास्केटमध्ये सात महिन्यांची बालिका आढळून आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २१ एप्रिल) पहाटे उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, माले येथील हॉटेल फोर सीजनसमोर रस्त्यालगत गुलाबी रंगाच्या जाळीदार बास्केटमध्ये ही बालिका ठेवलेली आढळली. स्थानिक रहिवासी रेखा वाल्हेकर आणि समीर वाल्हेकर यांच्या निदर्शनास ही बाब आली.
त्यांनी तत्काळ गावातील नागरिकांच्या मदतीने पौड पोलीस ठाण्याला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार महेश पवार, अनिता रवळेकर आणि राजकुमारी हरिश्चंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेत बालिकेला ताब्यात घेतले.
तिची वैद्यकीय तपासणी करून पुढील काळजीसाठी निगडी येथील आधार संस्थेत दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेबाबत कोणाकडे काही माहिती असल्यास संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.





