Babir Devasthan Rui: बाबीर देवस्थानला मिळणार ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मोठी घोषणा
Babir Devasthan Rui: बाबीर देवस्थानला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासह रस्ता व पुलाच्या कामासाठी निधी देण्याचे आश्वासन; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून २५ लाखांचा निधी जाहीर.

Babir Devasthan Rui – इंदापूर तालुक्याशी अजित पवार यांचे जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे नाते होते. तालुक्यातील विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. बाबीर देवस्थानशीही त्यांचे श्रद्धा आणि जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे बाबीर देवस्थानच्या विकासासाठी यापुढेही शासनाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य केले जाईल.
देवस्थानकडे जाणाऱ्या रस्ता व पुलाच्या मागणीसाठी निश्चितपणे निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच बाबीर देवस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. श्री बाबीर देवस्थान, रुई येथे मंदिराच्या कलशारोहण व लोकार्पण सोहळ्यात त्या रविवारी (दि. १३) बोलत होत्या.
या वेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सारिका दत्तात्रय भरणे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, आप्पासाहेब जगदाळे, यशवंत माने, सुधीर तांबे, नगराध्यक्ष भरत शहा, प्रदीप गारटकर, प्रवीण माने, पृथ्वीराज जाचक, शशिकांत तरंगे, प्रतापराव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, “राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच इंदापूर तालुक्यात बाबीर देवस्थानच्या कलशारोहण सोहळ्यासाठी आले, याचा मला आनंद आहे. बाबीर देवस्थान हे केवळ मंदिर नाही, तर हजारो-लाखो भाविकांच्या श्रद्धेचे आणि विश्वासाचे प्रतीक आहे. नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून त्याची सर्वदूर ख्याती आहे.
त्यामुळे राज्याच्या विविध भागांतून तसेच राज्याबाहेरूनही मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात.” राज्यातील आध्यात्मिक आणि धार्मिक स्थळांचा नियोजनबद्ध विकास झाला तर धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल. त्यातून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. बाबीर देवस्थान परिसरात स्वच्छता, स्वच्छ पाणी,
स्वच्छतागृह, वाहनतळ यांसारख्या सुविधा उभारल्या जात आहेत. दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असल्याने या परिसराचा नियोजनबद्ध आणि व्यापक विकास करणे आगामी काळात गरजेचे आहे. भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आपण स्वतः कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
‘अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा’
राजमाता अहिल्यादेवी होळकर या आपल्या सर्वांच्या प्रेरणास्थान आणि श्रद्धास्थान आहेत. त्यांनी देशभरात अनेक मंदिरे उभारली, तसेच लोकांच्या सुविधांसाठी विविध कामे केली. खऱ्या अर्थाने समाजसेवा हाच त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा आपण सर्वांनी पुढे नेला पाहिजे, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.
कृषिमंत्री भरणेंकडून २५ लाखांची घोषणा
या वेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बाबीर देवस्थान परिसराच्या विकासासाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. “वहिनी, तुमच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. राज्यात काम करण्यासाठी बाबीर देवाचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहणार आहे,” असा विश्वास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.






