Maval News: बैलगाडा शर्यतीतील ‘भारत केसरी’ ओम्याचे निधन; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाहिली श्रद्धांजली
Maval News: भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि फायनल सम्राट ठरलेल्या ओम्याच्या जाण्याने बैलगाडा शर्यत क्षेत्रात मोठी पोकळी.

Maval News- बैलगाडा शर्यतीत घाटाचा राजा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या ओम्याचे गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) निधन झाले. त्यानिमित्त महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनी मंगळवारी (दि. १) सायंकाळी वारंगवाडी येथे बैलमालक रामनाथशेठ वारींगे आणि माजी सरपंच वामनराव वारींगे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी ओम्याला श्रद्धांजली वाहिली.
ओम्या आणि वारींगे कुटुंबीयांमध्ये जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. कुटुंबीयांनी दिलेले प्रेम आणि विश्वास त्याने शर्यतीच्या घाटात आपल्या कामगिरीतून परतफेड केला. अनेक बैलगाडा शर्यतींमध्ये त्याने विजयी कामगिरी करत विविध बक्षिसे पटकावली. त्याच्या कामगिरीमुळे त्याला घाटाचा राजा, फायनल सम्राट, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि मावळ किंग अशा बिरुदावल्या मिळाल्या.
ओम्याने आपल्या कारकिर्दीत तीन जेसीबी, दोन स्कॉर्पिओ, आठ थार, बारा ट्रॅक्टर, तीन बोलेरो, १७५ दुचाकी आणि २५ चांदीच्या गदा अशी अनेक बक्षिसे मिळविली होती. त्यामुळे त्याची ओळख केवळ वारींगे कुटुंबीयांच्या बैलापुरती मर्यादित राहिली नाही. मावळसह राज्यभरातील बैलगाडा शर्यतीच्या शौकिनांच्या मनात त्याने वेगळे स्थान निर्माण केले.
कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनीही ओम्याच्या आठवणींना उजाळा देत त्याने आपल्या कामगिरीतून वारींगे कुटुंबीयांचा विश्वास सार्थ ठरविल्याचे सांगितले. ओम्या आज आपल्यात नसला, तरी त्याचा तुफानी वेग, दमदार कामगिरी आणि शर्यतीतील लौकिक बैलगाडा शौकिनांच्या स्मरणात कायम राहील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्यासह बैलगाडा मालक, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





