Babar Azam Video : भर मैदानात बाबर आझमचा चढला पारा! सेल्फी मागणाऱ्या चाहत्याचा हिसकावून फेकला फोन; पाहा VIDEO
Babar Azam Video : तब्बल सात वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या बाबर आझमचा भर मैदानात चाहत्यावर राग अनावर झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Babar Azam Snatches Throws Fan Phone Viral Video Domestic Match Security Lapse : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझम (Babar Azam) सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर असला तरी तो पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. तब्बल सात वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या बाबर आझमचा भर मैदानात राग अनावर झाला. सामन्यादरम्यान मैदानावर थेट घुसून सेल्फी घेण्याचा हट्ट धरणाऱ्या चाहत्यावर संतापून बाबरने त्याचा मोबाईल हिसकावून थेट मैदानाबाहेर भिरकावून दिला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्याच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
डायमंड ग्राऊंडवर गोंधळ; चाहते थेट खेळपट्टीजवळ पोहोचले!
ही घटना पाकिस्तानातील प्रसिद्ध प्रेसिडेंट ट्रॉफी ग्रेड-१ (President’s Trophy Grade-1) स्पर्धेदरम्यान घडली. डायमंड क्रिकेट ग्राऊंडवर सामना सुरू असताना दोन क्रिकेटप्रेमी सुरक्षेची तटबंदी भेदून थेट मैदानात घुसले. त्यांनी थेट बाबर आझमच्या जवळ जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय सामन्यांतील प्रोटोकॉल नसलेल्या या स्थानिक स्पर्धेत चाहत्यांच्या अशा वागण्याने बाबर प्रचंड वैतागला आणि त्याने रागाच्या भरात चाहत्याच्या हातातील फोन हिसकावून दूर फेकून दिला.
पहिल्या दिवशी दिला होता धक्का; दुसऱ्या दिवशी घडला प्रकार!
Babar Azam throws a fan’s phone in anger after being asked for a selfie. 🤯 pic.twitter.com/UYtEt5yhMp
— Sheri. (@CallMeSheri1_) September 30, 2026
विशेष म्हणजे, याच सामन्याच्या पहिल्या दिवशीही दोन चाहते अशाच प्रकारे खेळपट्टीजवळ धावत आले होते. त्यावेळी बाबरने एका चाहत्याला धक्का देत मैदानाबाहेर जाण्याचा इशारा केला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच पुनरावृत्ती झाल्याने बाबरचा संयम सुटला आणि त्याने आक्रमक पवित्रा घेतला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी बाबरच्या वर्तनावर कडाडून टीका करत त्याला जोरदार ट्रोल केले आहे.
७ वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतोय बाबर; सुरक्षेचा बोजवारा!
बाबर आझम तब्बल ७ वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये उतरला असून, या ८ संघांच्या स्पर्धेत तो ऑईल अँड गॅस डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (OGDCL) चे प्रतिनिधित्व करत आहे. एका नामांकित आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या सामन्यात मैदानाभोवती एकही सुरक्षारक्षक तैनात नसल्याचे या घटनेवरून उघड झाले असून, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





