Avadhut Gupte | छावा सिनेमाला महाराष्ट्रातून आणि देशभरातून उंदड प्रतिसाद मिळाला. या सिनेमात विकी कौशल आणि रश्मिका तसेच अक्षय खन्नाच्या कामाचही कौैतुक झालं. छावात अनेक मराठी कलाकरांनी भूमिका साकारलेल्या आहेत. संतोष जुवेकर त्यापैकी एक कलाकार. पण त्याच्या भूमिकेपेक्षाही त्याला गेल्या काही दिवसांत ट्रोलिंगचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. याचीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यावर आता गायक अवधुत गुप्ते याने संतोषसाठी केलेली पोस्ट चर्चेत आहे.
अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत असल्यामुळे मला त्याच्याशी बोलावसंच वाटलं नाही, या एका वाक्यावरुन ट्रोलर्सने संतोषला ट्रोल केलं. त्याचे मीन्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्याने केलेल्या विधानाचा अनेकांनी समाचार घेत त्याच्या विधानावर टीकाही केली. आता त्याचा मित्र प्रसिद्ध गायक अवधुत गुप्तेने मित्रासाठी पोस्ट लिहित नेटकऱ्यांचे कान टोचले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत एका अमराठी अभिनेत्याचा खुल्या दिलानं स्विकार करून तुम्ही तुमचं मोठं मन दाखवून दिलं आहे. आता आजूबाजूच्या मराठी अभिनेत्यांचे कौतुक करण्याची वेळ आली आहे. तिथे कमी पडून कमावलेलं घालवू नका.
कुटुंबातील सोहळा आहे. एखादा कुटुंबीय विचित्र नाचला. त्याला चिडवून झालं! आता पुरे! आता त्याला जवळ घ्या, अशी पोस्ट करत एका मित्रासाठी दुसऱ्या मित्राने केलेली पोस्ट चर्चेत आहे.
या पोस्टमध्ये अवधुतने संतोषच्या सिनेमांच्या कारकीर्दीवही भाष्य केले आहे. “अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत असल्यामुळे मला त्याच्याशी बोलावसंच वाटलं नाही” हे त्याचं वक्तव्य कुणालातरी खरोखरच हास्यास्पद वाटू शकतं. पण, त्यावर हसण्याआधी जरा संतोषच्या आधीच्या कारकिर्दीकडे बघणं गरजेचं आहे. ‘झेंडा‘ च्या वेळेस ‘संत्या‘ च्या भूमिकेच्या मुळातच खूप जवळ असलेला संतोष, केवळ अजून त्यात शिरता यावं म्हणून संपूर्ण चित्रिकरणा दरम्यान त्या चाळीतच राहिला होता. ‘मोरया‘ च्या वेळेस देखील तसंच. ‘एकतारा‘ हा चित्रपट गायकाच्या आयुष्यावर आधारित. त्या भूमिकेसाठी संतोष साधारणपणे वर्षभर गायन आणि गिटार वाजवणे शिकत होता. असे अवधुतीने संतोषविषयी पोस्टमध्ये लिहिले आहे.