Aundh District Hospital: पिंपरी-चिंचवडकरांना मोठं गिफ्ट! २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
Aundh District Hospital: राज्य मंत्रिमंडळाकडून 'प्रगती' आरोग्य सुधारणा प्रकल्पांतर्गत पिंपरीतील जिल्हा रुग्णालयात २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयास मंजुरी.

Aundh District Hospital – पिंपरी-चिंचवडमधील जिल्हा रुग्णालयात २०० खाटांचे अत्याधुनिक सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (दि. ८) मंजुरी दिली. ‘प्रगती’ आरोग्य सुधारणा प्रकल्पांतर्गत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, रुग्णालयासाठी ७७२ पदांची निर्मिती, अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री, पायाभूत सुविधा आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी दिली आहे.
यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ‘प्रगती’ आरोग्य सुधारणा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तब्बल ४ हजार २५० कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून राज्यातील जिल्हा रुग्णालयांना आधुनिक स्वरूप देण्यावर भर दिला जाणार आहे. जिल्हा रुग्णालये केवळ उपचार केंद्र न राहता सर्वसमावेशक आरोग्यसेवेची केंद्रे म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.
पुणे जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयामुळे हृदयरोग, कर्करोग, मेंदू व मज्जासंस्थेचे आजार, मूत्रपिंडविकार यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांना महागड्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची किंवा उपचारासाठी दूरवर जाण्याची गरज कमी होण्याची शक्यता आहे.
जिल्हा रुग्णालयात आणखी ४०० खाटा वाढविण्याची मागणीही करण्यात आली असून, त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली. जिल्हा रुग्णालयाच्या क्षमतेत वाढ करून नागरिकांना माफक दरात दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत कोल्हापूर आणि नांदेड येथे ५०० खाटांची, तर नागपूर आणि लातूर येथे ३०० खाटांची जिल्हा रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित आहे. या पाच रुग्णालयांसाठी एकूण २ हजार ४३० पदे निर्माण करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
“२०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या मंजुरीमुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. पदनिर्मिती, निधी आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे गंभीर आजारांवरील दर्जेदार उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी पुढेही प्रयत्नशील राहणार आहे.”
– शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ






