Rohit Pawar : कर्जत व जामखेडमधील उपजिल्हा रुग्णालये कार्यान्वित करा; रोहित पवार यांची मागणी
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांच्या आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये कर्जत येथील ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांचे तर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून तेथेही १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी आणली आणि त्यासाठी भरीव निधीही आणला.

Rohit Pawar : कर्जत आणि जामखेड या दोन्ही ठिकाणच्या उपजिल्हा रुग्णालयांची कामे अंतिम टप्प्यात आली असून इथे मंजूर केलेली पदे तातडीने भरावीत आणि या उपजिल्हा रुग्णालयांचे लोकार्पण करावे, अशी मागणी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली. तसेच मिरजगाव येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी वाढीव निधी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्याची मागणीही त्यांनी केली.
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांच्या आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये कर्जत येथील ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांचे तर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून तेथेही १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी आणली आणि त्यासाठी भरीव निधीही आणला.सध्या या दोन्हीही उपजिल्हा रुग्णालयांची कामे जवळपास पूर्णत्त्वास गेली आहेत.
तसेच मिरजगाव येथेही ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करुन आणले आणि याचेही काम जवळपासून ७५ टक्के पूर्ण झाले आहे. कर्जत आणि जामखेड येथील उपजिल्हा रुग्णालयांसाठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सातत्याने पाठपुरावा करुन जून २०२६ मध्ये आवश्यक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, तांत्रिक कर्मचारी तसेच इतर आवश्यक पदे मंजूर करून आणली आणि याबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात आला आहे.
काल त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन याबाबत त्यांचे आभार मानले. या दोन्ही ठिकाणी मंजूर झालेल्या पदांची अद्याप भरती झालेली नाही, ती भरती करुन दोन्ही उपजिल्हा रुग्णालये नागरिकांच्या सेवेत लवकरात लवकर कार्यान्वित करावीत, अशी मागणी यावेळी आमदार रोहित पवार यांनी मंत्री आबिटकर यांच्याकडे केली.
दरम्यान, मिरजगाव येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी सुमारे १५ कोटी रुपयांच्या वाढीव निधीची आवश्यकता असल्याचेही रोहित पवार यांनी आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. हा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, तसेच मिरजगाव उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांचा प्रस्ताव मंजूर करून त्यासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
कर्जत, जामखेड आणि मिरजगाव या तीनही ठिकाणी उपजिल्हा रुग्णालये उभी करण्यामागचा उद्देश केवळ इमारती बांधणे नसून, मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे रुग्णालयांच्या उभारणीपासून निधी, मनुष्यबळ आणि आवश्यक सुविधांपर्यंत प्रत्येक बाबीचा पाठपुरावा करून ही आरोग्य केंद्रे पूर्ण क्षमतेने नागरिकांच्या सेवेत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी स्पष्ट केले.





