Metrozip private bus service : आयटीत काम करणाऱ्यांनी लक्ष द्या! कोव्हिडमध्ये बंद झालेली ‘ती’ बससेवा लवकरच सुरू होणार
Metrozip private bus service : पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या गहन झालेली आहे. एका अहवालानुसार पुण्यातील वाहतूक कोंडीचा देशात पहिल्या पाचमध्ये नंबर लागतो. हा खरंच चिंतेचे विषय आहे. पुण्यातील हिंजवडी भागात आयटी पार्कचं जाळं पसरलेलं आहे. येथील कंपनीत काम करणारा वर्ग मोठा आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर ये जा येथून होत असते. परिणामी वाहतूक कोंडाचा सामना करावा लागतो. आता या समस्येवर एक तोडगा काढण्यात आला आहे.
हिंजवडीतील आयटी पार्क परिसरात पुन्हा एकदा मेट्रोझिप ही खाजगी बससेवा सुरू होणार असल्याची शक्यता आहे. हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने पुढाकार घेत हा निर्णय घेतला आहे. यामुळे वाहतूक कोंडीच्या समेस्येवर आयटीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही दिलादायक बातमी आहे.
ही सेवा पहिल्यांदा 2014 साली सुरू करण्यात आली होती. मात्र, कोविड महामारी आणि ‘वर्क फ्रॉम होम’च्या संकल्पनेमुळे 2020 नंतर ही सेवा बंद करण्यात आली होती. आता ही बससेवा पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. एचआयएने पुन्हा एकदा मेट्रोझिप बससेवा सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव MIDC आणि RTO कडे सादर केला आहे. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता असून, त्यानंतर लगेचच ही बससेवा सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
कुणाला ‘या’ बससेवेचा लाभ घेता येणार?
HIA कडे नोंदणीकृत असलेल्या 200 हून अधिक कंपन्यांमधील कर्मचारी व अभियंते या सेवेचा लाभ घेऊ शकतील.
एकूण 150 ते 200 खासगी बसगाड्या रस्त्यावर धावतील.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील जवळपास सर्व भागांतून हिंजवडीकडे या बसगाड्या सुटतील.
खासगी गाड्यांचा वापर कमी करणे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.





