प्रभात वृत्तसेवा लोणावळा – मावळी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकदरम्यान लावण्यात आलेल्या दुभाजकामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आणि गैरसोयीचा निषेध करत लोणावळा व्यापारी संघटनेने ४ ऑगस्टपासून संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. यापूर्वी, १३ जुलै रोजी व्यापाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी आता बेमुदत बाजार बंदचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांच्या मते, दुभाजकामुळे रस्ता अधिक अरुंद झाला असून, वाहतूक सुरळीत होण्याऐवजी कोंडीत वाढ झाली आहे. स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि पुणे-मुंबई मार्गे येणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अरुंद रस्त्यावर दुभाजक बसविल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असून, दुचाकीस्वार जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. या समस्येमुळे स्थानिक बाजारातील व्यवहारावरही परिणाम झाला आहे. आगामी रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेशोत्सव अशा सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता, दुभाजकामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे, अशी भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी दुभाजक तात्काळ काढण्याची मागणी केली आहे. अन्यथा ४ ऑगस्टपासून बेमुदत बाजार बंद करण्यात येईल, असा इशारा व्यापारी संघटनेने दिला आहे.