ATP Finals 2024 : बोपण्णा-एबडेन जोडीला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का….

ATP Finals 2024 (Bopanna-Ebden) : भारतीय टेनिस स्टार रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडेन या जोडीला एटीपी फायनल गटातील पहिल्याच सामन्यात सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला.
बोपण्णा आणि एबडेन यांचा इटलीच्या सिमोन बोलेली आणि अँड्रिया वावासोरी यांनी अवघ्या 56 मिनिटांत 6-2, 6-3 असा पराभव केला. गेल्या वर्षी बोपण्णा आणि एबडेन यांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये याच जोडीचा पराभव केला होता.
बोलेली आणि वावसोरीने सुरुवातीपासूनच दडपण कायम राखले. आठव्या गेममध्ये बोपण्णा आणि एबडेनच्या दुहेरी चुकीचा फायदा घेत त्यांनी सर्व्हिस तोडली आणि सतत दबाव कायम ठेवला. दुसऱ्या सेटमध्येही पुन्हा तेच घडलं. चौथ्यांदा ही स्पर्धा खेळणाऱ्या बोपण्णा आणि एबडेन यांना इटालियन संघाची भक्कम सर्व्हिस मोडता आली नाही आणि एकही ब्रेक पॉइंट घेता आला नाही.
ATP Finals 2024 : स्पेनच्या कार्लोस अल्कराजचे आव्हान संपुष्टात…
इटालियन जोडीविरुद्ध बोपण्णा (R. Bopanna) आणि एबडेन (M. Ebden)यांचा यंदाचा हा सलग तिसरा पराभव आहे. ते आता बॉब ब्रायन गटात चौथ्या स्थानावर आहेत. पुढील गट लढतीत त्यांचा सामना बुधवारी (13 नोव्हेंबर) सांयकाळी 4.00 वाजता एल साल्वाडोरच्या मार्सेलो अरेव्हालो (M. Arevalo) आणि क्रोएशियाच्या मेट पॅव्हिक (M. Pavic) यांच्याशी होईल.





