ATP Finals 2024 : इटलीचा ‘यानिक सिनर’ ठरला विजेता..! फ्रिट्झला केलं पराभूत, बक्षीसरूपी कमावलं 40 कोटी….

ATP Finals 2024 (Jannik Sinner vs Taylor Fritz) : अव्वल मानांकित टेनिस खेळाडू यानिक सिन्नरने रविवारी इटली येथे एटीपी फायनल्सच्या विजेतेपदाच्या लढतीत अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झचा पराभव करून ट्राफीवर आपले नाव कोरले. जबरदस्त फॉर्मात असलेल्या सिनरने घरच्या प्रेक्षकांसमोर यूएस ओपन उपविजेत्या फ्रिट्झचा 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सिनरने या स्पर्धेतील सर्व 5 सामने जिंकले. या विजयातून त्याला बक्षीसरूपी सुमारे 40 कोटी रुपये ($4.8 मिलियन) मिळाले.
Players to win Australian Open, US Open and #NittoATPFinals in the same year:
Roger Federer 🏆
Novak Djokovic 🏆
Jannik Sinner 🆕End of list. pic.twitter.com/4MauBkis3C
— Tennis TV (@TennisTV) November 17, 2024
फ्रिट्झने उपांत्य फेरीत दोन वेळचा विजेता जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव केला होता. त्यामुळे अंतिम सामना खूपच रोमांचक होईल असे मानले जात होते, परंतु सिनरने आपला फॉर्म कायम ठेवत फ्रिट्झला एकही संधी दिली नाही. सिनर आणि फ्रिट्झ यांच्यातील अलीकडच्या काही महिन्यांतील हा तिसरा सामना होता. सिनरने तिन्ही सामने जिंकले. यूएस ओपनचा अंतिम सामनाही या दोघांमध्ये रंगला होता. या स्पर्धेच्या गट फेरीतही दोन्ही खेळाडू आमने-सामने आले होते.
या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन आणि यूएस ओपन चॅम्पियन सिनरने संपूर्ण स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली आणि प्राथमिक फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत प्रत्येक सामना एकतर्फी जिंकला. गेल्या 27 सामन्यांमधला त्यांचा हा 26वा विजय होता. त्याने यंदाच्या वर्षाचा शेवट 70-06 अशा विजय-पराजय विक्रमासह आणि आठ विजेतेपदांसह पूर्ण केले.
सर्वोत्तम आठ खेळाडूंमध्ये खेळली गेलेली वर्षातील अंतिम स्पर्धा जिंकणारा तो पहिला इटालियन खेळाडू ठरला आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सिनरने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन आणि यूएस ओपनचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेदरम्यानच त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाची ट्रॉफीही मिळवली होती.
दुहेरीत पुट्झ-क्रॅविट्झ विजेते…
दुहेरीचे विजेतेपद जर्मनीच्या टीम पुट्झ आणि केविन क्रॅविट्झ यांनी पटकावले. या जोडीने अंतिम फेरीत क्रोएशियाच्या मॅट्स पॅव्हिक आणि एल साल्वाडोरच्या मार्सेलो अरेव्हालो यांचा 7-5 (5), 7-6 (6) असा पराभव केला.
वाडाचे अपील….
सिनर यंदाच्या वर्षी वादात सापडला आहे. तो दोनदा डोप पॉझिटिव्ह आढळला होता, परंतु आरोपातून निर्दोष मुक्त झाला होता. त्याच्या निर्दोष सुटकेविरोधात वाडाने अपील केले आहे. ज्यावर वर्षाच्या सुरुवातीला निर्णय होणार आहे.





