पुणे जिल्हा | खेळाडू की जनावरे? क्रीडा स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक

पळसदेव, (वार्ताहर) – सध्या संपूर्ण जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धा सुरु आहेत जिल्हा तालुकास्तरीय स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेसाठी सररास विद्यार्थ्यांना टमटम किंवा पिकअप, छोटा हत्तीमधून अगदी जनावरांची वाहतूक केले प्रमाणे गच्च भरून धोकादायक पद्धतीने खेळाडूंची वाहतूक केली जात आहे.
त्यामुळे खेळाडूंची कुचंबणा होत आहे. अनेक खेळाडू यामुळे खेळात सहभागी होण्यासाठी अधिक उत्साह दाखवत नाहीत.
सध्या तालुक्यात कबड्डी, खो-खोसह इतर मैदानी क्रीडा स्पर्धा सुरु आहेत. दर वर्षी आशाच पद्धतीने खेळाडूंची वाहतूक केली जात आहे व संघ विजयी झाल्यावर संबंधित शाळेचा गौरव केला जात आहे
मात्र या खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी खेळाडूंना संस्था व शाळांनी सुविधा देणे आवश्यक असताना ते याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अनेक पालक विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असताना देखील त्यांना खेळासाठी पाठवण्यासाठी धजवत नाहीत.
त्यामुळे खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव मिळत नाही परिणामी अनेक खेळाडू इच्छा असताना देखील मुख्य प्रवाहात येत नसल्याचं चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.
खेळाडूंना क्रीडा स्पर्धाना जा-ये करण्यासाठी विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक न करता बसची व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचं मत क्रीडा प्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.





