Atharva Sudame : गणेशत्सवाच्यावेळी प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे एका रीलमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. रील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टोर्लसकडून टीका करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा एका रीलमुळे अथर्व सुदामे अडचणीत सापडला आहे. यावेळी त्याला पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये व्हिडीओबाबत अथर्व सुदामेने लेखी खुलासा करावा, असे म्हटले आहे. तसेच सोशल मीडियावरुन संबंधित व्हिडीओ हटविण्यास सांगण्यात आले असून तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अशातच आता अथर्व सुदामेनं याप्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अथर्व सुदामे नेमकं काय म्हणाला? अथर्व सुदामे आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हणाला की, “नमस्कार बरेचसे न्यूज चॅनेल्स आणि माध्यमं माझं रील न बघता वाट्टेल ते लिहीत आहेत आणि पसरवत आहेत. मी ना कोणाला प्रतिक्रिया दिलीय ना कोणाशी चर्चा केली आहे, तरीही कोणीही काही वाक्य माझा फोटो आणि नाव वापरून पसरवत आहेत. तर काही लोकं Ai चा वापर करून वाट्टेल ते विधान माझ्या नावाने खपवत आहेत त्यामुळं कृपया अशा कुठल्याही फेक न्यूजवर विश्वास ठेऊ नका. मला जर काही बोलायचं असेल तर ते मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलीन…” नेमकं कारण काय? मिळालेल्या माहितीसनुसार, पूर्वपरवानगी न घेता पीएमपीच्या बसमध्ये रिल्स काढून या रीलमध्ये महामंडळाचा गणवेश, ई-मशीन आणि बॅच बिल्ला यांचा बेकायदेशीर वापर करण्यात आला आहे. या प्रकरणी पीएमपी प्रशासनाकडून अथर्व सुदामेला नोटीस बजाविण्यात आली आहे. पीएमपीच्या नोटीसमध्ये अथर्व सुदामेने व्हिडीओमुळे पीएमपीची प्रतिमा मलीन होत असल्याचे देखील म्हटले आहे. गणेशोत्सवाच्यावेळी अथर्व सुदामेला हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणाऱ्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित रिल त्याला हटवावे लागले. आता पुन्हा एकदा रीलमुळेच अथर्वची अडचण वाढली असून यावेळी त्याला थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.