Atharva Sudame | Asim Sarode । Ganeshotsav 2025 : पुण्यातील प्रसिद्ध मराठमोळा सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे हा नेहमीच चर्चेत असतो. त्याने सोशल मीडियावर अपलोड केलेले व्हिडीओ नेहमची चर्चेचा विषय ठरतात. लोकांना खळखळून हसवणाऱ्या व्हिडीओंच्या माध्यमातून तो लोकांचे जमेल तशा पद्धतीने प्रबोधनही करत असतो. सध्या मात्र त्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन धर्मांमधील सामाजिक सलोखा राखण्यासंदर्भात केलेल्या एका छोट्या रिलवरुन मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. या वादानंतर अथर्वने स्वत: माघार घेत हा व्हिडीओ डिलीट केला असून जाहीर माफी मागितली आहे. मात्र, आता नामांकीत वकील असिम सरोदे यांनी अथर्व सुगामेच्या समर्थनात पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमधून असिम सरोदे यांनी अथर्व सुदामेनं व्हिडीओ डिलीट केल्या, ते योग्य केलं नाही, असंही म्हटलं आहे. तसेच, अथर्वने तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा. कोण काय करतंय ते बघूयात, असं म्हणत अथर्वला पाठींबा दिला आहे. असिम सरोदे नेमकं काय म्हणाले? नामांकीत वकील असिम सरोदे यांनी अथर्व सुदामेच्या समर्थनात एक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये असिम सरोदे म्हणाले की, “अथर्व सुदामे याने घाबरून व्हिडीओ डिलीट केला हे योग्य केले नाही असे वाटले. अथर्वबाबत अनेक लोक विविध मतं मांडतात. त्याच्या व्हिडीओतील विनोदाच्या दर्जाबाबत बोलले जाते. परंतु त्यानं जे रिल्स सातत्यानं तयार केलेत, स्पर्धेच्या युगात स्वतःचा एक मार्ग तयार केला, त्याचं कौतुक करायलाच पाहिजे. त्याचे काही विनोद अनेकांना उथळ,पांचट, निरर्थक वाटले असतील पण ते अश्लील नव्हते…” “कधी उथळ, गंभीर, गमतीदार, विचार प्रवर्तक तर कधी सुमारही अशा वळणांवरून एखादा विषय नेमकेपणाने हाताळला जातो तेव्हा धमक्या देणाऱ्यांना घाबरून अथर्वने त्याचा अत्यंत सुंदर आणि सामाजिकता, बंधुभाव, प्रेम जपण्याचे आवाहन करणारा व्हिडीओ डिलीट करणे मला चिंताजनक वाटले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे असे टुकार हल्ले ठामपणे परतवून लावता आले पाहिजेत. तेवढयासाठी मी अथर्व सोबत आहे…”, असं असिम सरोदे म्हणाले आहेत. “राज ठाकरे साहेबांनी अथर्वचं जाहीर कौतुक केलं होतं, तेव्हा पासून अथर्वने अधिक जबाबदारीने अनेक विषय हाताळले असे सुद्धा दिसते. एका उत्तम व्यंगचित्रकाराने दिलेल्या कौतुकाच्या शब्दांनी अथर्वला प्रोत्साहन मिळाले. पण आता काही सुमार धर्मवादी अथर्वला धमक्या देत असतांना राज ठाकरेंनी व मनसेने अथर्वच्या सोबत उभे राहावे असे आताच माझे राज साहेबांसोबत बोलणे झाले. अथर्वने तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा. कोण काय करतंय ते बघूया.”, असं असिम सरोदे म्हणाले. नेमकं प्रकरण काय? गणेशोत्सवाच्या निमित्तानं अथर्व सुदामेनं एक रिल शेअर केलं आहे. या रिलमध्ये अथर्व सुदामे एका भाविकाच्या भूमिकेत दिसतोय. अथर्व गणेशोत्सवासाठी गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी मूर्तीकाराकडे जातो. मूर्तीकाराच्या कारखान्यात असंख्य मूर्ती असतात. त्यातली एक मूर्ती अथर्व बूक करतो. तेवढ्यात मूर्तीकाराचा मुलगा अब्बू अशी हाक मारत तिथे येतो. तेवढ्या अथर्व सुदामे आणि तो मूर्तीकार एकमेकांकडे पाहतात. तेवढ्यात मूर्तीकार अथर्वला सांगतो की, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पुढे जाऊन मूर्ती पाहू शकता… मूर्तीकाराला वाटतं की, अथर्व सुदामे मूर्ती खरेदी करेल की नाही? पण, अथर्व सुदामे तुमच्याकडूनच मूर्ती घ्यायची आहे, असं मूर्तीकाराला निक्षूण सांगतो. अथर्व सुदामे मूर्तीकाराशी बोलताना म्हणतो की, “माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीरखुर्माही… तसेच आपण वीट व्हावं जी वीट देवाळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील…” असा संवाद या रीलच्या शेवटी अर्थवच्या तोंडी देण्यात आला आहे. मात्र, आता याच व्हिडिओवरून त्याला ट्रोल करण्यात आलं आहे. ब्राह्मण महासंघाची आगपाखड : यावरुन मोठा वाद झाला. अथर्वला ट्रोल केलं जाऊ लागलं. त्यानंतर अथर्वला शिव्या, धमक्या देण्यात आल्या. आता या वादात ब्राह्मण महासंघाने उडी घेतली आहे. ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी या विषयावर बोलताना सुदामेने केवळ मोनरंजन करावं, अभ्यास नसलेल्या विषयाबद्दल बोलू नये, असं सांगितलं आहे. अन् सुदामेने माफी मागितली… या व्हिडीओवर काही लोकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सुदामेने हा व्हिडीओ डिलीट केला आहे. त्याने गेल्या अनेक वर्षांपासून मी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडीओ तयार करतो. या व्हिडीओच्या माध्यमातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता, असे म्हणत माफी मागितली आहे.