Atharva Sudame: प्रसिद्ध रील स्टार अथर्व सुदामे अडचणीत; PMPMLने पाठवली नोटीस, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Atharva Sudame : आपल्या विनोदी व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर अल्पावधीत लोकप्रिय झालेला पुण्याचा रील स्टार अथर्व सुदामे आता कायदेशीर पेचात अडकला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बसमध्ये कोणतीही पूर्वपरवानगी न घेता चित्रीकरण करणे आणि महामंडळाच्या अधिकृत वस्तूंचा वापर करणे त्याला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी पीएमपी प्रशासनाने अथर्वला कडक शब्दांत नोटीस बजावत सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
अथर्व सुदामे याने पीएमपी बसमध्ये चित्रीकरण करताना महामंडळाचा अधिकृत गणवेश, ई-मशीन आणि बॅच बिल्ला यांचा बेकायदेशीरपणे वापर केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या रीलमध्ये महिला प्रवाशांचे चित्रण अपमानास्पद पद्धतीने करण्यात आल्याचा गंभीर आरोपही महामंडळाने केला आहे. अशा प्रकारच्या कृत्यामुळे महिलांच्या सन्मानाला आणि प्रतिष्ठेला बाधा पोहोचत असून, सार्वजनिक बस सेवेची जनमानसातील प्रतिमा मलिन होत असल्याचे प्रशासनाने नोटिशीत म्हटले आहे. हे कृत्य महामंडळाच्या अंतर्गत नियम आणि धोरणांच्या पूर्णपणे विरोधात असून यामुळे व्यावसायिक हितावर विपरित परिणाम होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या नोटिशीद्वारे अथर्वला संबंधित आक्षेपार्ह रील इन्स्टाग्रामवरून तातडीने काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, भविष्यात महामंडळाची लेखी परवानगी घेतल्याशिवाय बससेवेबाबत कोणतेही फोटो, व्हिडिओ किंवा मजकूर प्रसारित करू नये, अशी तंबीही देण्यात आली आहे. स्वारगेट येथील मुख्य कार्यालयात सात दिवसांच्या आत हजर राहून लेखी स्पष्टीकरण न दिल्यास किंवा रील न हटवल्यास कायदे आणि नियमांनुसार पुढील कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) यांनी दिला आहे.
View this post on Instagram





