मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेचा जाहीरनामा रविवारी प्रसिद्ध झाला. या जाहीरनाम्यावर सत्ताधारी भाजपकडून जोरदार टीका झाली आहे. भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ठाकरे बंधूंनी दिलेली आश्वासने नागरिकांच्या पचनी पडण्यासारखी नाहीत. त्यामुळे हे वचननामा नव्हे तर अपचननामा आहे. त्यांनी म्हटले की, “ठाकरे बंधूंनी जाहीर केलेले वचननामा ऐकल्यानंतर नागरिकांना अपचन होण्यास सुरुवात होते.” शेलारांनी शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतील कारभाराचा उल्लेख करत, भाजपकडून येत्या काळात भ्रष्टाचाराचा सर्व लेखाजोखा जनतेसमोर आणला जाईल, असे सांगितले. त्यांनी मतदारांना ठाकरे बंधूंवर गोंधळ न करता भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी देखील जाहीरनाम्यावर टीका करत म्हटले की, “महापौर झाल्यास महाराष्ट्र पाकिस्तानसारखा होईल. राज ठाकरे यांचे कार्यकर्ते मारामारी करत आहेत आणि संस्कृती धोक्यात आहे. येणाऱ्या निवडणुकीत भगवा फडकणार आहे आणि महायुतीचा महापौर बसणार आहे.” साटम यांनी शिवसेनेच्या कामकाजाचा तुलनात्मक आढावा घेत, सांगितले की, “मराठी माणसासाठी उद्धव ठाकरे यांनी २५ वर्षांत एक काम केले असे दाखवावे, तर आम्ही १० कामे प्रत्यक्षात केली आहेत. बीडीडी चाळीत लोकांना घर दिले, तुम्ही मातोश्री दोन बनवले.”