Hockey Asia Cup 2025 : भारताचा विजयरथ सुसाट; चीनचा धुव्वा उडवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री!

Indian Mens Hockey Team Asia Cup 2025 Final : भारतीय पुरुष हॉकी संघाने शनिवारी सुपर फोरच्या शेवटच्या सामन्यात चीनचा 7-0 असा धुव्वा उडवत आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतासमोर सध्याचे गतविजेत्या दक्षिण कोरियाचे आव्हान असेल. या विजयासह भारत सुपर फोर गुणतक्त्यात सात गुणांसह अव्वल स्थानावर राहिला, तर दक्षिण कोरियाने चार गुणांसह दुसरे स्थान मिळवले.चीन आणि मलेशिया दोघेही प्रत्येकी तीन गुणांसह मागे राहिले.
भारतीय संघाचा वर्चस्वपूर्ण खेळ –
भारतीयांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखण्यात वेळ वाया घालवला नाही. चौथ्या मिनिटालाच त्यांच्या प्रयत्नांना यश आले, जेव्हा शिलानंदने पहिला गोल करत खाते उघडले. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या हाफ लाइनवरून दिलेल्या शानदार हवाई पासला जरमनप्रीत सिंगने उजव्या बाजूने नियंत्रित केले आणि तो शिलानंदकडे वळवला. शिलानंदने त्याला गोलमध्ये रूपांतरित करण्यात चूक केली नाही.गोल केल्यानंतरही भारतीयांचा आक्रमक खेळ कायम राहिला आणि काही मिनिटांतच शिलानंदने संघासाठी पेनल्टी कॉर्नर मिळवला. त्यानंतर भारतीय संघाने गोल करत आघाडी दुप्पट केली. यानंतर एकामागोमाग एक असे सात गोल केले.
Final bound!👊
India confirm their spot in the Final of the Hero Asia Cup Rajgir, Bihar 2025, after a stellar Super 4s campaign. 🇮🇳🫡#HockeyIndia #IndiaKaGame #HumseHaiHockey #HeroAsiaCupRajgir pic.twitter.com/nt5wlwPIxW
— Hockey India (@TheHockeyIndia) September 6, 2025
सुपर-4 मध्ये भारत अजेय –
यापूर्वी भारताने सुपर फोर टप्प्यातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाच वेळा विजेता ठरलेल्या दक्षिण कोरियाशी 2-2 अशी बरोबरी साधली होती आणि मलेशियाचा 4-1 असा पराभव केला होता. आशिया कपचा विजेता संघ पुढील वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड्स यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहे. भारत आता विश्वचषक पात्रतेपासून फक्त एक पाऊल दूर आहे.
कोरियाचे शानदार पुनरागमन –
दिवसातील दुसऱ्या सामन्यात कोरियाने मागे पडल्यानंतर शानदार पुनरागमन करत मलेशियाचा 4-3 असा पराभव केला. चीन आता रविवारी तिसऱ्या-चौथ्या स्थानासाठी मलेशियाशी खेळेल. सुपर फोर सामन्यात कोरियाकडून झालेल्या पराभवामुळे मलेशिया अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला. कोरियासाठी ह्येनहोंग किम (24वे, 51वे), सेयोंग ओह (44वे) आणि जुंगजुन ली (50वे) यांनी गोल केले. मलेशियासाठी फिट्री सारी (9वे), ऐमन रोजेमी (29वे) आणि चोलन (31वे) यांनी गोल केले.





