ICC Men’s T20 Batting rankings : तिलक वर्माची जोरदार मुसंडी..! क्रमवारीत 69 स्थानांनी झेप घेत थेट Top-3 मध्ये मिळवलं स्थान….

ICC Men’s T20 Batting rankings (Tilak Varma) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुरुष टी-20 क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली आहे. या नव्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंची ताकद दिसून आली आहे. वास्तविक, भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने 2024 मध्ये आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. त्याने ICC पुरुषांच्या T20I अष्टपैलू क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. तसेच भारतीय संघाचे युवा फलंदाज तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनीही फलंदाजी क्रमवारीत मोठी नव्हे तर गरूडझेप घेतली आहे.
वास्तविक, भारताचा युवा आणि स्फोटक फलंदाज तिलक वर्मा याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या टी 20 सामन्यात सलग 2 शतकं झळकावली. तिलक वर्मा याने यासह संजू सॅमसन याच्या सलग 2 टी-20 शतकांच्या विक्रमाची बरोबर केली होती. एकूण 280 धावा करून तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. तिलकला या कामगिरीचा जबरदस्त फायदा झाला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या टी-20 क्रमवारीत तिलक वर्मानं मोठी झेप घेतली आहे. तिलकला या 2 शतकांमुळे थोडा-थोडका नव्हे तर तब्बल 69 स्थांनाचा फायदा झाला आहे.
तिलक वर्मा याआधी क्रमवारीमध्ये 72 व्या स्थानी होता. मात्र त्याला 2 शतकांमुळे जबरदस्त फायदा मिळाला आहे. तिलक 72 व्या क्रमांकावरुन थेट तिसऱ्या स्थानी येऊन पोहचला आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड हा 855 रेटिंगसह पहिल्या तर इंग्लंडचा फिल सॉल्ट 828 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे.
Tilak Varma’s meteoric rise in the ICC T20I rankings 🚀 pic.twitter.com/4SMvPbpddn
— CricTracker (@Cricketracker) November 20, 2024
तिलकने आपलाच कर्णधार सूर्यकुमार यादव याला मागे टाकला आहे. तिलकची रेटिंग 806 तर सूर्याची 788 रेटिंगसह चौथ्या स्थानी आहे. तिलकने यासह टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, रूतुराज गायकवाड, शुभमन गिल, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या यासारख्या फलंदाजांना मागे टाकलं आहे.
सॅमसनचीही मोठी झेप..
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसननेही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यात शतक झळकावले होते तसेच तो दोनदा शून्यावरही बाद झाला होता. त्यानेदेखील 17 स्थानांची झेप घेतली आहे. आता तो टी-20 फलंदाजी क्रमवारीत 22 व्या स्थानावर पोहचला आहे. याव्यतिरिक्त भारताचा युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल 706 गुणांसह 8व्या तर रूतूराज गायकवाड 619 रेटिंगसह 15 व्या क्रमाकांवर आहे.





