IPL : ‘इम्पॅक्ट प्लेयर’ संतुलन बनविण्यासाठी महत्वाचा – रविचंद्रन अश्विन

Ashwin backs Impact Player rule – भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट प्लेयर’ या नियमाला निष्पक्ष असल्याचे सांगून यामुळे सामन्यामध्ये रणनीतीचे महत्व वाढल्याचे सांगितले आहे. भारताचे फलंदाज विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी या नियमावर आक्षेप नोंदविला होता. यामुळे क्रिकेटचा विकास थांबणार असून यामुळे गोलंदाज व फलंदाज यांच्यात असलेले संतुलन बिघडणार असल्याचे त्यांचे मत होते. मात्र, अश्विनने थेट ‘इम्पॅक्ट प्लेयर’ या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
‘इम्पॅक्ट प्लेयर’ या नियम आयपीएलच्या २०२३ च्या हंगामापासून आमलात आणण्यात आला होता. यामुळे सर्व संघाना आपल्या सामन्यादरम्यान एका बदली खेळाडूंचा वापर करण्याची मुभा मिळाली होती.
के. श्रीकांत यांच्या पॉडकास्ट मध्ये या संदर्भात बोलताना अश्विन म्हणाला, या नियमामुळे रणनीतीमध्ये सुधारणा करण्यास वाव मिळत असल्याने या नियमाला विरोध करण्याची आवश्यकता नाही. यावेळी बोलताना त्याने व्यकंटेश अय्यरचे उदाहरण देताना म्हणाला, की अय्यरने लँकाशयार संघाकडून खेळाताना त्याने शानदार कामगिरी केली आहे. या नवीन प्रयोग म्हणजे खेळाडूंसाठी एक संधी आहे, जी खेळाला निष्पक्ष बनविण्यास मदत करत आहे, असे अश्वीन म्हणाला.
सायंकाळी दव पडल्यानंतर देखील अनेकदा या नियमामुळे खेळात संतुलन आणता येऊ शकेल. कधी कधी दव पडल्यानंतर फलंदाजी अधिक सोपी होते. मात्र, दवामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी या नियमाचा आधार घेतल्यास याचा फयादा गोलंदाजी करणाऱ्यास संघास होऊ शकतो. याचबरोबरीने फलंदाजी करणारा संघाला देखील या नियमामुळे एक अतिरिक्त फलंदाज उतरविता येऊ शकतो. या नियमामुळेच शहाबाज अहमद, शिवम दुबे व ध्रुव जुरेल अशा खेळाडूंना संधी मिळाली असल्याचे अश्विनने बोलताना सांगितले.
क्रिकेटच्या वाढीसाठीच इम्पॅक्ट प्लेयर – खान
हा नियम अनेक उदयोन्मुख भारतीय खेळाडूंसाठी फायदेशीर आहे. यामुळे अनेक प्रतिभावान खेळाडूना संधी मिळण्याची शक्यता आहे. येणाऱ्या मेगा लिलावात देखील सर्व फ्रँचायझी अशा खेळाडूंवर चांगली बोली लावतील. एकंदरीतच क्रिकेटमध्ये सुधारणा करण्याची ही चांगली संधी आहे, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज जाहीर खान याने व्यक्त केले. नुकतीच जाहीर खान याची लखनौ सुपर जायंट्सच्या मार्गदर्शकपदी निवड करण्यात आली आहे.





