David Malan Retirement : इंग्लंडच्या स्फोटक फलंदाजाची क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती, समोर आलं ‘हे’ कारण….

David Malan Retirement :- इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. 22 कसोटी, 30 एकदिवसीय व 62 टी-20 लढतीमध्ये मलानने इंग्लंडसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही प्रकारात डेव्हिड मलानने शतकी खेळी केली होती. यापूर्वी अशी कामगिरी करणारा जोश बटलरनंतर तो इंग्लडंचा दुसरा खेळाडू होता.
गतवर्षी भारतीय संघासोबत झालेल्या एकदिवसीय मालिकेनंतर मलानला इंग्लंड संघात स्थान मिळविता आले नव्हते. नुकतीच ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये देखील मलानचा समावेश न करण्यात आल्याने अखेर त्याने निवृत्तीची घोषणा केली.
💬 “Right now, as I retire from international cricket, I can say I am genuinely satisfied.”
🎙️ @DMalan29#EnglandCricket | #ThankYouMala
— England Cricket (@englandcricket) August 28, 2024
इंग्लंडचा आक्रमक फलंदाज असलेला मलान याने टी-20 क्रमवारीत अग्रस्थान मिळविले होते. त्याने 2017 मध्ये टी-20 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या आपल्या पहिल्याच लढतीत त्याने 44 चेंडूत 77 धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. तसेच मलानने कसोटीमध्ये 1 हजार 074, एकदिवसीय लढतीमध्ये 1 हजार 450 तर टी-20 मध्ये 1 हजार 892 धावा केल्या आहेत.
इंग्लंड संघाची साथ सोडल्यानंतर डेविड मलान आता टी-20 फ्रेंचायसी क्रिकेट खेळताना दिसू शकतो. सध्या तो द हंड्रेड लीग खेळत आहे. 2021 च्या आयपीएलमध्ये त्याला पंजाब किंग्स संघाने दीड कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले होते. या हंगामात त्याने केवळ 1 लढत खेळताना 26 धावांची नोंद केली आहे.





